अवघ्या नऊ महिन्यांत खड्डे कसे? भुयारी मार्गापेक्षा रेल्वे फाटक बरे होते..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:32 IST2025-11-10T19:31:26+5:302025-11-10T19:32:47+5:30
शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करून पुन्हा सिमेंटने रस्ता बनविण्याचे काम रविवारी पूर्ण झाले.

अवघ्या नऊ महिन्यांत खड्डे कसे? भुयारी मार्गापेक्षा रेल्वे फाटक बरे होते..!
छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर भुयारी मार्गातून सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी वाहतूक बंद राहिल्याने शहरवासीयांसह सातारा-देवळाईतील ६० हजार रहिवासी आणि वाहनधारकांची कोंडी झाली. येथे खड्डे पडल्याने दुरुस्तीसाठी भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आला. परंतु, अवघ्या नऊ महिन्यांत खड्डे कसे पडले ? भुयारी मार्गापेक्षा रेल्वे फाटक बरे होते, अशा शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करून पुन्हा सिमेंटने रस्ता बनविण्याचे काम रविवारी पूर्ण झाले. अनेक वाहनधारक हे शिवाजीनगर भुयारी मार्गापर्यंत येत होते. परंतु, मार्ग बंद असल्याचे पाहून त्यांना माघारी फिरावे लागले. शहानूरमियाँ दर्गा चौकमार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरून वाहनधारकांना सातारा-देवळाईकडे ये-जा करावी लागली. परिणामी, दिवसभर शहानूरमियाँ दर्गा चौकात वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.
भुयारी मार्गात पाणी
शिवाजीनगर भुयारी मार्गात पावसाळ्यात अनेकदा पाणी साचले. पाणी निचरा होण्याचा मार्ग योग्य पद्धतीने करण्यात आला नसल्यानेच हा भुयारी मार्ग पावसात तुंबत आहे. सध्या पाऊस नसतानाही भुयारी मार्गात पाणी साचलेले रविवारी पाहायला मिळाले.
छत बसविण्यासाठीही होते बंद
छत बसविण्याचे काम जुलै महिन्यात करण्यात आले. तेव्हाही हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
रेल्वे अधिकारी म्हणाले..
रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डे पडले आणि ते खराब झाले. तसेच रस्त्याच्या पृष्ठभागावर ५० ‘मिमी’ पर्यंत खोलीकरण झाले. त्यामुळे काँक्रीट टाकण्यात आले, अशी माहिती रेल्वेच्या गतिशक्ती योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
उड्डाणपुलाची मागणी करण्याची वेळ
भुयारी मार्गाचा बट्ट्याबोळ केला आहे. नागरिकांची डोकेदुखी वाढलीच आहे. अनेक तांत्रिक त्रुटींमुळे हा मार्ग गैरसोयीचा ठरत आहे. अपघातही होत आहे, परंतु संबंधित यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. उड्डाणपुलाची मागणी करण्याची वेळ आली आहे.
- बंद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती