छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम साईटवर भीषण अपघात; दोन मजूर ठार, तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:16 IST2025-04-08T17:15:16+5:302025-04-08T17:16:16+5:30
मुरूम थेट लोखंडी गजांवर कोसळल्यामुळे त्याचे तुकडे व दगड मजुरांच्या अंगावर पडले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम साईटवर भीषण अपघात; दोन मजूर ठार, तिघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपासवरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या (कॅपिटल ट्रेड सेंटर - CTC) बांधकाम साईटवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला. बेसमेंटचे काम सुरू असताना अचानक मुरूम कोसळून दोन मजूर जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सदर संकुलासाठी सुमारे 60 ते 70 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या खड्यात पायाभरणी आणि बेसमेंटचे काम सुरू होते. मात्र, अचानक आमदार रोडच्या दिशेने असलेला मुरूम ढासळून थेट मजुरांवर कोसळला. यावेळी साईटवर 5 हून अधिक मजूर उपस्थित होते.मुरूमच्या ढिगाऱ्यामुळे दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मुरूम थेट लोखंडी गजांवर कोसळल्यामुळे त्याचे तुकडे व दगड मजुरांच्या अंगावर पडले. यामुळे तेथे काम करत असलेले मजूर खाली दाबून अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.