पौरोहित्य करणाऱ्या तरुणाने स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी; घरात नशेच्या गोळ्या अन् चिठ्ठी सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:39 IST2026-03-30T12:22:47+5:302026-03-30T12:39:41+5:30
पौरोहित्य करणाऱ्या तरुणाच्या घरात ३३० नशेच्या गोळ्या आणि सुसाईड नोट; छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

पौरोहित्य करणाऱ्या तरुणाने स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी; घरात नशेच्या गोळ्या अन् चिठ्ठी सापडली
छत्रपती संभाजीनगर: शहरातील एन-६, साईनगर भागात एका ३१ वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. समीर नाईक असे या तरुणाचे नाव आहे. सिडको पोलिसांनी रविवारी समीरच्या घराची झाडाझडती घेतली असता, तिथे मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या आणि दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
प्राथमिक तपासानुसार, समीर हा गेल्या काही काळापासून नशेच्या आहारी गेला होता आणि त्याच तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घराच्या झडतीत धक्कादायक वास्तव समोर
सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी समीरच्या खोलीची तपासणी केली असता, तिथे ३३० भांगसदृश (नशेच्या) गोळ्या आणि सुमारे १५० ते २०० रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. समीर हा नेहमी उज्जैन परिसरात जात असे, तिथूनच त्याने हा साठा आणल्याचा संशय आहे. याशिवाय रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यात त्याने या कृत्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे.
पौरोहित्य करणारा तरुण 'गावठी कट्ट्या'पर्यंत कसा पोहोचला?
समीर हा आपल्या आई आणि भावासोबत भाड्याच्या घरात राहत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पौरोहित्य आणि आईचे बांगड्यांचे दुकान सांभाळत असे. शनिवारी सायंकाळी आई दुकानात गेल्यानंतर त्याने स्वतःच्या उजव्या कानाजवळ गावठी पिस्तूल लावून गोळी झाडली. गोळी डोक्याच्या आरपार गेल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. एका खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालय घाटी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, समीरने हे पिस्तूल नेमके कोठून आणि कोणाकडून मिळवले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
धार्मिक ओढा आणि नशेचे जाळे
समीर हा महादेवाचा भक्त असून अनेकदा उज्जैनला जात असे. मात्र, एका बाजूला अध्यात्मिक ओढा आणि दुसऱ्या बाजूला नशेचे वाढते व्यसन यामुळे तो मानसिक तणावात असल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून डायरी आणि इतर कागदपत्रे जप्त केली असून, त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे उच्चभ्रू वस्ती असलेल्या एन-६ भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.