छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी, पुंडलिकनगरात पुन्हा गुंडगिरी डोईजड; लुटमारीसाठी हत्येच्या प्रयत्नाची दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:23 IST2025-11-26T18:22:43+5:302025-11-26T18:23:09+5:30
पुंडलिकनगरमध्ये तरुणाचा पाठलाग करून चाकू खुपसला; आदल्या दिवशी दुकानदाराकडून ४ हजार घेतले, तक्रार नसल्याने आत्मविश्वास वाढला

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी, पुंडलिकनगरात पुन्हा गुंडगिरी डोईजड; लुटमारीसाठी हत्येच्या प्रयत्नाची दुसरी घटना
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी, पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गुन्हेगारांनी डोकेवर काढले असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी हल्ला करण्याची पाच दिवसांतच दुसरी घटना घडली. तीन जणांच्या टोळक्याने पोशट्टी गंगाधर डुबकवाड (४०, रा. मुकुंदवाडी) यांच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसून हत्येचा प्रयत्न केला. २३ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी २४ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
जयभवानीनगरात राहणारे पोशट्टी २३ नोव्हेंबरला कामानिमित्त मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात गेले होते. ८ वाजेच्या सुमारास ते तेथीलच दारूच्या अड्ड्याजवळ उभे असताना, दोन अज्ञातांनी त्यांना खाली पाडले. तेवढ्यात दुसऱ्याने त्यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून पोबारा केला. स्वत:ला सावरून पोशट्टी घरी गेले. मोबाइलचे बिल घेऊन ते मुकुंदवाडी ठाण्यात जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात गल्ली क्रमांक ९ मध्ये पुन्हा तिघांनी त्यांना अडवले. पायात पाय अडकवून जमिनीवर पाडत मारहाण केली. त्यांचे खिसे चाचपूण पैशांची मागणी करून मोठमोठ्याने आरडाओरड केली. मात्र, त्यांच्या खिशात काहीच मिळून न आल्याने त्यांना बेदम मारहाण करून एकाने थेट त्यांच्या पोटात चाकू खुपसला. यात रक्तबंबाळ होऊन पोशट्टी बेशुद्ध झाले.
एक रेकॉर्डवरील गुन्हेगार
संबंधित लुटमार व हल्ला मुकुंदवाडीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आर्यन दाणे याच्यासह अतुल मुऱ्हाडे, कार्तिक बामणे या टवाळखोरांनी केल्याचे समोर आले. त्यांच्यावर मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी गुरुवारीच ‘मोक्का’त जामिनावर बाहेर असलेल्या संकेत किशोर लामदांडे (२२, मुकुंदवाडी गाव) याने एका तरुणाचा पाठलाग करत चाकूने सपासप वार केले होते.
लुटमार, गुंडगिरी सातत्याने, पोलिस करताहेत काय ?
रविवारी याच परिसरात एका गुंडांच्या टोळीने एका किराणा दुकाना व्यवसायिकाला धमकावून चार हजार हिसकावून नेले. मात्र, या गुंडांच्या भीतीमुळे त्याने तक्रार केली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. दहा दिवसांपूर्वी शिवाजीनगरवरून राजनगर मार्गे घरी परतत असलेल्या एका दुचाकीस्वाराला अपघाताचे कारण करून गुुंडांनी घेऊन धारदार काेयते बाहेर काढले. त्याला जिवे मारण्याची धमकी देत जागीच पैसे उकळले. मुकुंदवाडी, रामगनर, राजनगर परिसरात ही गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत असून, शिवाजीनगर, रेल्वे स्थानक, राजनगर, रामनगर हा नव्याने झालेला रस्ता अत्यंत धोकादायक झाला असताना, पोलिस मात्र करताहेत काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.