अतिवृष्टीमुळे निराशा वाढली; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:18 IST2025-10-08T14:16:16+5:302025-10-08T14:18:40+5:30
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली असून यातून तिघांनी टोकाचे निर्णय घेतले.

अतिवृष्टीमुळे निराशा वाढली; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी जीवन संपवले
दौलताबाद/बनकिन्होळा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली असून, हताश तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा व गंगापूर तालुक्यातील जांभळा येथे सोमवारी तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथे मंगळवारी उघडकीस आली. रामेश्वर पुंडलिक फरकाडे (वय ३४), जगन्नाथ रखमाजी आढाव (वय ६०) व अरुण अशोक मंजुळ (वय ३३ वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत.
माळीवाडा शिवारात गट क्रमांक ६७ मध्ये जगन्नाथ आढाव यांची १ एक्कर ३७ गुंठे शेती आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले. या पीक लागवडीसाठी केलेला खर्च आणि घेतलेले कर्ज कसे फेडावे, याच चिंतेत ते मानसिक तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास माळीवाडा शिवारातील गट क्रमांक ५५ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
सव्वा एकरमधील मका, कापूस हातचे गेल्याने जीवन संपविले
बनकिन्होळा : सव्वा एकर शेतात लागवड केलेला कापूस आणि मका ही पिके अतिवृष्टीने हातची गेल्याने निराश झालेल्या सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील एका ३४ वर्षीय शेतकरी रामेश्वर पुंडलिक फरकाडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. मृत शेतकरी रामेश्वर फरकाडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रामेश्वर यांचे एक ते दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेची नोंद वडोद बाजार पोलिस ठाण्यात झाली आहे.
जाभांळा येथे मध्यरात्री उठून घेतला गळफास
गंगापूर तालुक्यातील जाभांळा येथील शेतकरी अरुण अशोक मंजुळ यांच्या आईच्या नावाने खडकनारळा व वसुसायगाव शिवारात गट नं. १११ व १३१ मध्ये पाच एकर शेती आहे. त्यात त्यांनी यंदा कापूस व तूर लावली होती. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्ज काढून, उसणवारी करून खरिपात लागवड केली आणि आता हातचे पिकही गेले, असे म्हणून अरूण मंजूळ हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते. यातूनच त्यांनी सोमवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी ॲंगलला साडीने गळफास घेतला. साडीचा पदर तुटल्याने अरूण मंजुळ हे खाली पडल्याने आवाज ऐकूण त्यांच्या आईने खोलीत डोकावून पाहिले असता त्यांना अरूण हे पडलेले आणि लोखंडी ॲगलला साडी दिसली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईक जमा झाले. त्यांनी अरूण यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अरुण मंजुळ यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे.