अतिवृष्टीचा मराठवाड्यातील एमआयडीसींनाही फटका, पाणी शिरल्याने अनेक कंपन्यांतील काम ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:43 IST2025-09-29T19:42:40+5:302025-09-29T19:43:12+5:30
पंधरा दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस सुरू आहे. औद्योगिक वसाहतींमध्येही अतिवृष्टीमुळे समस्या निर्माण झाल्या.

अतिवृष्टीचा मराठवाड्यातील एमआयडीसींनाही फटका, पाणी शिरल्याने अनेक कंपन्यांतील काम ठप्प
छत्रपती संभाजीनगर : पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मराठवाड्यातील औद्योगिक वसाहतींनाही बसला. शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले.
पंधरा दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस सुरू आहे. औद्योगिक वसाहतींमध्येही अतिवृष्टीमुळे समस्या निर्माण झाल्या. याविषयीच्या तक्रारी संबंधित कंपन्यांकडून एमआयडीसी प्रशासनाकडे येत आहेत. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी पैठण मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसाचा फटका पैठण औद्योगिक वसाहतीमधील पाच कंपन्यांना बसला. तेथील मे. मॅट्रिक्स लाइफ सायन्स कंपनीच्या पार्किंगमध्ये पाणी साचले होते. तेथे पाणी वाहून जाण्यासाठी नाला रुंदीकरण गरजेचे आहे. याच वसाहतीमधील हिंदुस्थान कंपोजिट कंपनीत पावसाचे पाणी शिरले.
मीनाक्षी ॲग्रो इंडस्ट्रीत पाणी शिरल्याने कामगारांना गैरसोयीचा सामना करावा लागला. महेश इंडस्ट्रीजमध्येही गुरुवारी पाणी शिरल्याने कागदी पुठ्ठ्याच्या मालाचे नुकसान झाल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज बोर्डे मिल कंपनीत पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले. जालना येथे अतिरिक्त टप्पा १ औद्योगिक क्षेत्रातील दोन विद्युत ट्रान्सफाॅर्मर जळाले. टप्पा २ एमआयडीसीतील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नांदेड एमआयडीसीतील पालदेवार प्रशांत ॲग्रो टेक कंपनीत पाणी शिरल्याने कंपनीचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यातील भूम औद्योगिक वसाहतीमधील जय किसान इंडस्ट्रीजसमोरील मुरमाचा भराव पावसामुळे वाहून गेला. तेथे पक्की नाली बांधण्याची मागणी कंपनीचालकाने केली आहे. कळंब औद्योगिक वसाहतीमधील यश फेब्रिकेशन कंपनीलगतच्या मुरमाचा भरावही वाहून गेला आहे.
वाळूज एमआयडीसीतील रस्त्यांसाठी १६ कोटी
अतिवृष्टीमुळे विविध एमआयडीसीतील रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एमआयडीसी प्रशासनाने याबाबतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांना छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीत दिली. तेव्हा, रस्त्यांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी त्यांनी तातडीने मंजूर केला.
वाळूज एमआयडीसीतील ए सेक्टरला अतिवृष्टीचे पाणी
शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वाळूज एमआयडीसीतील 'ए' सेक्टर ला बसला. या सेक्टरमधील रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या नाल्यांची कामे अर्धवट सोडण्यात आली. परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यावरून १५ ते २० कंपन्यांमध्ये शिरले. मुसळधार पावसाचा अलर्ट असल्याने आज २५ ते३० टक्के कामगारांनी कामावर येण्याचे टाळले. ज्या कंपन्यातील कामगार स्वत:च्या वाहनांनी ये- जा करतात, त्यांना कंपनीच्या वाहनातून घरी नेऊन सोडावे लागत आहे. याचा परिणाम उत्पादनावर झाला.
- डॉ. शिवाजी कान्हेरे, उद्योजक.