अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्यात पावसाने घेतला ३४ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 11:50 IST2022-07-15T11:48:44+5:302022-07-15T11:50:02+5:30
लहान, मोठी मिळून ३५१ जनावरे गेली वाहून

अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्यात पावसाने घेतला ३४ जणांचा बळी
औरंगाबाद : मराठवाड्यात ८ ते १५ जुलै दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने ३४ जणांचा बळी घेतला असून, लहान-मोठी मिळून ३५१ जनावरे पुरात वाहून गेली आहेत. मृत व्यक्तींमध्ये वीजपडून २४ जण, तर पुरात वाहून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ जुलैपासून मराठवाड्यात सूर्यदर्शन नव्हते. १५ जुलै रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरणात बदल झाला. सूर्यदर्शन झाल्यामुळे हवेतील गारवा थोड्या प्रमाणात कमी झाला.
विभागातील आठ जिल्ह्यांत २५१ दुधाळ जनावरे दगावली आहेत, तर ओढकाम करणारी १३६ जनावरे दगावली आहेत. २६ मृतांच्या नातेवाइकांना एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे एक कोटी चार लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने दिला आहे. ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे कामही जिल्हाप्रशासन पातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने कळविली आहे.
मागील सात दिवसांतील जोरदार पावसाने ३९० गावांना पुराचा वेढा पडला. यात हिंगोलीतील ६२, नांदेडमधील ३१०, बीडमधील १, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील दोन गावांचा समावेश आहे. या दोन दिवसांत १६० मोठी, तर ३० लहान जनावरे दगावली आहेत, तर ६० हजार हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली आहेत. मराठवाड्यात ८ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू होता. १५ जुलै रोजी पावसाने उघडीप दिली.
जिल्हा--- मृत्यू
औरंगाबाद--९
जालना --७
परभणी --१
नांदेड --१०
बीड --२
लातूर --४
उस्मानाबाद-- १
एकूण-- ३४