औरंगाबाद : कधी आभाळाची साद, कधी मातीची हाक, कधी प्रियेच्या डोळ्यातलं हळवं स्वप्न, तर कधी बळीराजाची तापल्या उन्हातली अखंड वणवण... लोकशाहीतील विरोधाभास, राजकारणातील सत्तास्पर्धा, विकासातला विनाश, त्यात हरवलेली जनसामान्यांची व्यथावेदना... आशयघन शब्दपेरणीतून उगवलेल्या हिरव्यागार कवितांनी श्रोत्यांना हसवले, हलवले अन् अंतर्मुखही केले. निमित्त होते ‘लोकमत’च्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कविसंमेलनाचे. गुलाबी थंडीत रंगलेल्या संध्येला औरंगाबादकरांनी भरभरून उपस्थिती लावली.‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी कवींसह मान्यवरांचे स्वागत केले. लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, औरंगाबाद आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन, चक्रधर दळवी, लोकमान्य चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेता सुबोध भावे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रा. ॠषिकेश कांबळे, प्रा. क्षमा खोब्रागडे, मनपा आयुक्त प्रकाश महाजन आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच ‘दाद देण्या-घेण्याचा व्यवहार आता मुक्तपणे होऊ द्या’ असे आवाहन करत म्हात्रे यांनी तरुण कवी इंद्रजित घुले यांना कविता वाचण्यास निमंत्रित केले. प्रेमभंगाचे दु:ख मिश्कीलपणे मांडणाऱ्या त्यांच्या, दिल्या शब्दाला जागलं पाहिजेप्रेम तिच्यावर करायचंघराभोवती फिरायचंअन् एखाद्या दिवशी तिच्याच मुलाने मला मामा म्हणायचं’या ओळींनी मनसोक्त हसवले. त्यानंतर आलेल्या तुकाराम धांडे या कवीने मात्र, संतश्रेष्ठ तुकोबा आणि त्याचे सामान्य आजोबा यांच्यातल्या जुन्या स्नेहबंधाचे आदिवासी बोलीतून भव्य दर्शन घडवले. जगा आणि जगू द्या हा साधा मंत्र सांगत जगायला शिकवणारे तुकोबा आणि आजोबा एकाच मानवी वंशातले होते, ही त्यांची कल्पना दाद मिळवून गेली. पाकिस्तानातील शाळकरी मुलांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचे शब्दचित्र ‘दहशतीच्या जंगलाचे नाव पाकिस्तान आहे’ या कवितेतून साकारले. चेहरा पाहून सांगा हे कसे मी ओळखावे, कोणता माणूस आहे कोणता सैतान आहे?हा प्रश्न प्रत्येकाला अस्वस्थ करून गेला. आजोबा झाल्यानंतर नातवाशी असलेले सुंदर नाते उलगडणारे त्यांचे गाणे प्रत्येकाच्या ओठात बसले. प्रा. सुरेश शिंदे यांनी शेतीमातीतल्या अस्सल प्रतिमा वापरत शिक्षण व्यवस्थेतील नकोशा संक्रमणावर कोरडे ओढले. ‘आभाळाच्या पाटीवर तू चांदण्यांचं पीक घे; पण भूक लागल्यावर भाकरीसाठी गावाकडच्या घरी ये’ आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणाला अशी साद घालत त्यांनी विचारात पाडले. मंगळवेढ्याच्या शिवाजी सातपुते यांनी खटकेबाज यमकांची आरास आणि वळणदार सादरीकरणातून भ्रष्ट व्यवस्थेचा मर्मभेदी पट मांडला. ‘तुमच्यासाठी कायपन’ व ‘करायचं काय?’ या त्यांच्या रचनांना वाहवा मिळाली. धांडे यांचे निसर्गकन्येच्या बोलीतले ‘पोर डोंगरावं भाळली...’ हे डोंगराचं गाणं रसिकांना रानावनात घेऊन गेले. ४मालवणी बोलीचा साज मिरवणारे डॉ. महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, वैदर्भीय बोली उलगडणारे तुकाराम धांडे, प्रेमभंगाचे दु:ख मांडणारा इंद्रजित घुले, गेय कवितांमधून दाद घेणारे योगीराज माने, शेतीमातीचा गंध जपणारे प्रा. सुरेश शिंदे, यमकांमधून मर्म टिपणारे शिवाजी सातपुते व अस्सल वेदनेची बोली बोलणारे भरत दौंडकर यांनी उत्स्फूर्त, प्रसन्न काव्यवाचनातून रसिकांची उत्कट दाद मिळविली.कळस चढवला तो कवी अरुण म्हात्रे यांच्या बहारदार निवेदनाने. प्रासंगिक किस्से, गाजलेल्या कवींच्या लकबी नेमक्या पकडत त्यांच्याच शैलीत सादर केलेल्या निवडक कविता, बेसावध क्षणी कवींना मारलेल्या कोपरखळ्या आणि मार्मिक शेरेबाजीतून त्यांनी विनोदाचा मळा फुलवला.
प्रसन्न कवितांना रसिकांची आभाळभर दाद
By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST
औरंगाबाद : कधी आभाळाची साद, कधी मातीची हाक, कधी प्रियेच्या डोळ्यातलं हळवं स्वप्न, तर कधी बळीराजाची तापल्या उन्हातली अखंड वणवण.
प्रसन्न कवितांना रसिकांची आभाळभर दाद
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}