स्वत:चं सैन्य शाबूत ठेवण्यासाठीच फडणवीसांची सरकार पडणार, अशी आवई - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 06:19 PM2020-11-13T18:19:03+5:302020-11-13T18:24:09+5:30

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

The government fall its a Fadnavis fake statement only to keep its army intact, says Jayant Patil | स्वत:चं सैन्य शाबूत ठेवण्यासाठीच फडणवीसांची सरकार पडणार, अशी आवई - जयंत पाटील

स्वत:चं सैन्य शाबूत ठेवण्यासाठीच फडणवीसांची सरकार पडणार, अशी आवई - जयंत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देफडणवीसांनी कराव्यात नुसत्या घोषणाआमचे आघाडी  सरकार मात्र भक्कम

औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस हे दर तीन महिन्यांनी सरकार पडणार, अशी आवई उठवून स्वत:चं सैन्य मजबूत करीत असतात. आता एक वर्ष संपलेलं आहे. पुढील चार वर्षंही हे सरकार भक्कमपणानं काम   करणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आकाशवाणी चौक येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले. आता एकनाथ खडसे आले. नजीकच्या काळात भाजपचे आणखी बरेचसे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले दिसतील, असे सांगून पाटील यांनी, पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीतही भाजपमध्ये आलबेल नाही, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. नॅशनल लॉ स्कूलचा प्रश्न असो, मराठवाड्याच्या वाट्याला येणाऱ्या वैद्यकीय प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ असो किंवा जुन्या पेन्शनचा प्रश्न असो, सतीश चव्हाण हे सातत्याने आवाज उठवत आलेले आहेत, अशा शब्दांत सतीश चव्हाण यांची पाटील यांनी प्रशंसा केली.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात जबरदस्त काम करीत आहे. मात्र, काही मंडळी गैरसमज निर्माण करण्यासाठी बडबड करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कामाला लागली आहे. तसा तर सतीश चव्हाण यांचा विजय झालेला आहे, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला. 

मंचावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिल पटेल, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी, जयंत पाटील यांनी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन केले. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलाश पाटील यांनी आभार मानले. ढोल-ताशांच्या गजरात आकाशवाणी  परिसर सकाळपासूनच दणाणून गेला होता. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

गाफील राहून  चालणार नाही...
शिक्षक आ. विक्रम काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी आपणच निवडून येणार या भ्रमात राहू नका, गाफील राहून चालणार नाही, असे मत नोंदवले‌. त्यांनी सांगितले, पूर्वी पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपची मक्तेदारी होती. ती मोडून काढण्याचे काम मी आणि सतीश चव्हाण यांनी केले आहे. शिक्षक मतदारसंघात तीन वेळा निवडून आलो. आता सतीश चव्हाण विजयी झाले, तर त्यांची हॅट्‌ट्रिक होईल.

Web Title: The government fall its a Fadnavis fake statement only to keep its army intact, says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.