पोलीस उपायुक्तांचे स्वीय सहायक गिरीश पोटभरे अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:56 IST2019-08-12T12:36:18+5:302019-08-12T13:56:11+5:30
भरधाव कारच्या धडकेत झाला मृत्यू

पोलीस उपायुक्तांचे स्वीय सहायक गिरीश पोटभरे अपघातात ठार
औरंगाबाद : पोलिस उपायुक्तांचे स्वीय सहायक (स्टेनो) गिरीश पोटभरे (वय 55) रविवारी (दि.११ ) रात्री १० वाजेच्या सुमारास अपघातात ठार झाले.
रामनगर, मुकुंदवाडी येथील रहिवासी गिरीश पोटभरे हे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी जात होते . जालना रोडवर चिकलठाणा येथील जैन समाजाच्या गौ-शाळेसमोर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
पोटभरे यांनी औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय , पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर आदी ठिकाणी काम केले. शासकीय सेवा सांभाळून आंबेडकरी चळवळीशी निष्ठा बाळगणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांच्या पश्चात शिक्षिका पत्नी, हैदराबाद येथे शिक्षण घेणारा मुलगा आणि पुण्यात शिक्षण घेत असलेली मुलगी, सुजित व सिद्धार्थ अशी दोन भाऊ आहेत. सोमवारी (दि.12) मुकुंदवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैचारिक आणि आंबेडकरी चळवळीच्या स्थिती विषयी त्यांनी कायम निर्भीड मते मांडले.