जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील ‘बंटी’चे शव विच्छेदनासाठी घाटीत; राजकीय सुडातून हत्येचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:59 IST2026-01-01T11:58:43+5:302026-01-01T11:59:43+5:30
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह बेगमपुरा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : रात्रीतून मृतदेहाचे सिटी स्कॅन करण्याचा निर्णय

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील ‘बंटी’चे शव विच्छेदनासाठी घाटीत; राजकीय सुडातून हत्येचा आरोप
छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी श्रीरामपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर बंटीचा मृतदेह विच्छेदनासाठी रात्री घाटी रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी अहिल्यानगर पोलिसांसह शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी बंटीला अटक करण्यात आली होती. त्यासह इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेच्या संपर्कात असल्याचा आरोपही बंटीवर होता. या बॉम्बस्फोटात १७ नागरिकांचा बळी गेला होता, तर ५० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. त्या गुन्ह्यात बंटीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर २०२३ मध्ये जामीन मिळाल्यापासून तो बाहेर होता.
बुधवारी दुपारी तो एका अंत्यसंस्कारासाठी गेला होता. त्याचदरम्यान दुचाकीवर आलेले हल्लेखोर त्याच्यावर गोळीबार करून पसार झाले. बंटीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर श्रीरामपूरमध्ये तणाव निर्माण झाला. सायंकाळी बंटीच्या शवाचे विच्छेदन छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मृतदेहाचे सिटी स्कॅन करण्याचा निर्णय
बंटीचा मृतदेह घाटीत येताच बेगमपुऱ्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांच्यासह पाेलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. मृतदेहाचे सिटी स्कॅन करून विच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरू होती.
राजकीय सुडातून हत्या- नातेवाइकांचा आरोप
असलम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार याची हत्या ही राजकीय सुडातून झाली आहे. ही हत्या पूर्वनियोजित होती, त्यासाठी रेकी केली होती, असा संशय आहे. त्यामुळे हत्येचा सखोल तपास करून हत्या करणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध घेतला पाहिजे, असे मयत बंटीचे चुलत भाऊ रईस जहागीरदार हे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
इन कॅमेरा शवविच्छेदन
अहिल्यानगर येथे शवविच्छेदन करण्यास नकार देत नातेवाइकांनी इन कॅमेरा शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्याची मागणी केली. त्यानुसार बुधवारी रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आला, असे रईस जहागीरदार यांनी सांगितले.
३ गोळ्या छातीवर, ३ पायांवर
बंटीच्या छातीवर ३ गोळ्या, डाव्या पायावर २ आणि उजव्या पायावर एक गोळी लागली आहे, असे रईस जहागीरदार यांनी सांगितले.
मित्राच्या कमरेतही गोळी
बंटीचे मित्र अमीन शेख यांच्या कमरेतही गोळी लागली आहे. त्यांच्यावर श्रीरामपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही रईस जहागीरदार यांनी सांगितले.