गाडीच्या वादातून मित्रांमध्ये वितुष्ट; तरुणाचे अपहरण, मारहाण आणि निर्वस्त्र करून चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:40 IST2025-05-15T11:32:48+5:302025-05-15T11:40:02+5:30
मित्रांमध्ये वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार

गाडीच्या वादातून मित्रांमध्ये वितुष्ट; तरुणाचे अपहरण, मारहाण आणि निर्वस्त्र करून चित्रीकरण
छत्रपती संभाजीनगर : मध्यस्ती करून भाडेतत्त्वावर मिळवून दिलेली गाडी परस्पर गहाण ठेवल्याच्या रागातून तिघांनी मित्राचे अपहरण केले आणि बेदम मारहाण केली. पंधरा तास ताब्यात ठेवत निर्वस्त्र करून माेबाइलमध्ये चित्रीकरण केले. करमाड पोलिसांनी पाठलाग करून अपहरणकर्त्यांची गाडी अडविल्यानंतर ही घटना उघड झाली. मंगळवारी पुंडलिकनगर पोलिसांनी यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
आकाश जाधव, कुणाल गोरे व भास्कर गायकवाड (सर्व रा.पुंडलिकनगर) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार गोपाळ धांडे (३८, रा.शिवाजीनगर) याने दोन महिन्यांपूर्वी सुनील नागरगोजे यांची इनोव्हा क्रिस्टा गाडी प्रतिदिन दीड हजार रुपये भाडेतत्त्वावर घेतली होती. यासाठी त्याचा मित्र आकाशने मध्यस्थी केली होती. मात्र, गोपाळने नागरगोजे यांची गाडी परस्पर जिंतूरच्या सुनील काजळकरकडे गहाण ठेवली. अडीच लाख रुपये उधार घेतले. यामुळे आकाशला संताप अनावर झाला. त्याने वारंवार गाडी परत देण्याची मागणी केली. ११ मे रेाजी आकाश, कुणाल गोरेने त्याच्या घरी जात गाडीची मागणी केली. मात्र, त्यांच्यात तेथे वाद झाले. आकाशने त्याला पिंप्रीराजा गावाकडे शेतात नेत बेदम मारहाण केली. शिवाजीनगरच्या भास्कर गायकवाडने तेथे जाऊन पुन्हा मारहाण केली. निर्वस्त्र करून मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर, रात्रभर आकाशच्या घरी ठेवले.
१२ मे रोजी सकाळी १० वाजता आरोपींनी गोपाळला करमाडकडील एका बारमध्ये नेत कपडे फाडून मारहाण केली. तेथून भास्करच्या गाडीत टाकून ते पुढे निघाले. मात्र, स्थानिकांना ही बाब गंभीर वाटल्याने त्यांनी करमाड पोलिसांना कळवले. करमाड पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू करत करमाड परिसरातच आरोपींना अडवले. गोपाळची सुटका झाल्यानंतर त्याने हा सर्व प्रकार सांगितला. करमाड पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसांना ही घटना कळविली. पुंडलिकनगर पोलिसांनी धाव घेत आरोपींना अटक केली. आरोपींवर यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नसून वैयक्तिक वादातून हा प्रकार झाला आहे. आरोपींना न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले. सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे अधिक तपास करत आहेत.