चार लाख हेक्टर कापूस धोक्यात

By Admin | Updated: October 30, 2014 00:28 IST2014-10-30T00:08:58+5:302014-10-30T00:28:33+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड यंदा तरी भरघोस पीक येईल अन् सावकाराचे व बँकेचे देणे जाईल. बळीराजाच्या या आशेवर पुरते पाणी फिरले असल्याचे चित्र बीड जिल्हयात आहे

Four lakh hectares of cotton hazard | चार लाख हेक्टर कापूस धोक्यात

चार लाख हेक्टर कापूस धोक्यात


व्यंकटेश वैष्णव , बीड
यंदा तरी भरघोस पीक येईल अन् सावकाराचे व बँकेचे देणे जाईल. बळीराजाच्या या आशेवर पुरते पाणी फिरले असल्याचे चित्र बीड जिल्हयात आहे.
जिल्हयात ४ लाख ३० हजार ९२ हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पिक आहे. मात्र कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला असून लाल्याचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ,अशी मागणी शेतकरी व बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील सरपंच अंकुश गोरे यांनी केली आहे.
मागील तीन ते चार वर्षापासून बीड जिल्हयात अल्प पाऊस होत आहे. गतवर्षी कापसाला भाव चांगला न मिळाल्याने शेतकरी पुरता कर्जात बुडाला. यंदा तरी चांगले पिक येईल या आशेवर असलेल्या बळीराजाच्या पांढऱ्या सोन्यावर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हादरला आहे. बीड जिल्हयात कापूस, सोयाबीन व उस ही नगदी पिके आहेत. यंदा जिल्हयात ४ लाख ३० हजार ९२ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. सुरूवातीला म्हणजेच जून-जुलै दरम्यान लागवडी पुरता पाऊस झाला. पाऊस पडला म्हटल्यावर काही शेतकऱ्यांनी उसणवारी तर काहींनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेवून कापसाची लागवड केली. जुलै नंतर मात्र पावसाने ताणल्याने कापसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. परिणामी खर्च तर झाला आता उत्पन्नाचा भरोसा नाही. अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे अर्थिक संकट उभा ठाकले आहे याबाबत कृषी उप संचालक बी. एम. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बीड जिल्हयात कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झालेला असल्याची माहिती आमच्या कार्यालया पर्यंत अद्याप पर्यंत आलेली नाही. अहवाल येताच पहाणी करून वरिष्ठ कार्यालयाच्या सुचने प्रमाणे पुढील प्रक्रीया केली जाईल असे त्यांनी सांगितले.
गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनाने शेतकऱ्यांना चांगलेच तारले होते. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीस ते चाळीस हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढले होते. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे सोयाबीनच्या पिकाने देखील शेतकऱ्यांना दगा दिला. यावर्षी जिल्हयात १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येत आहे. यापैकी पंच्याहत्तर टक्के सोयाबीनची काढणी व मळणी झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीनला झालेला खर्च देखील निघालेला नाही. ही वस्तूस्थिती बीड तालुक्यासह आष्टी, शिरूरकासार, गेवराई, केज परिसरात पहावयास मिळत आहे.

Web Title: Four lakh hectares of cotton hazard