पाणी चोरी करणारे चार कारखाने सील

By Admin | Updated: April 16, 2016 01:36 IST2016-04-16T01:28:55+5:302016-04-16T01:36:56+5:30

नांदेड :एकीकडे मराठवाड्यात प्रचंड दुष्काळामुळे नागरीक घागरभर पाण्यासाठी घायकुतीला येत असताना, मनपाच्या पाण्यावर डल्ला मारुन लाखो रुपयांची

Four factory sewers sealed | पाणी चोरी करणारे चार कारखाने सील

पाणी चोरी करणारे चार कारखाने सील


नांदेड :एकीकडे मराठवाड्यात प्रचंड दुष्काळामुळे नागरीक घागरभर पाण्यासाठी घायकुतीला येत असताना, मनपाच्या पाण्यावर डल्ला मारुन लाखो रुपयांची माया जमविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडात शुक्रवारी उघडकीस आला़ याबाबत माहिती मिळताच मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांनी अशा चार पाणी शुद्धीकरण कारखान्यांना सील ठोकले आहे़ त्यामुळे शुद्ध पाण्याचा अशुद्ध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात आता जेमतेमच साठा शिल्लक आहे़ इसापूर धरणाचे पाणी मिळाल्यामुळे पर्यायी उद्भव योजनेतून काही प्रमाणात का होईना नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे़ परंतु असे असतानाही नांदेडला सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्याचबरोबर शहरातील अनेक भागाची तहान ही टँकरवरच भागविली जात आहे़ त्यामुळे सर्वांचे पाणी बचतीवर लक्ष केंद्रीत झाले आहे़ अशा परिस्थितीत नांदेडात मात्र पाण्याचा धंदा तेजीत आहे़ एक लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी जवळपास दीड लिटर पाणी वाया जाते़
असे असताना, नांदेडात मात्र पाणी विक्रेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे़ यापैकी अनेक पाणी विक्रेत्यांनी मनपाची कुठलीच परवानगी घेतली नसून मुळ प्रश्न यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ त्यात आनंदनगर भागातील एका वॉटर प्लान्ट चालकाने मनपाच्या मुख्य जलवाहिनीला चोरट्या मार्गाने जोडणी देवून तेच पाणी वॉटर प्लान्टला वापरत असल्याची माहिती आयुक्त सुशील खोडवेकर यांना मिळाली़ त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास आयुक्त खोडवेकर यांनी फौजफाट्यासह या प्लान्टवर धाड मारली़ कारखाने चालविणाऱ्याकडे मनपाची परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले़ तसेच मनपाचे पाणी फिल्टर न करताच थेट जारमध्ये भरण्यात येत असल्याचेही उघडकीस आले़ त्यावर आयुक्तांनी हा वॉटर प्लान्ट त्वरित सील केला़ तसेच रस्त्यावरुन पाण्याचे जार घेवून जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत त्यांनी मनपाचे कर्मचारी पाठवून त्या प्लान्टची चौकशी करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार शहरातील चार प्लान्टला शुक्रवारी सील ठोकण्यात आले़ या वॉटर प्लान्ट चालकांनी मनपाची कोणतीच परवानगी काढली नव्हती़

Web Title: Four factory sewers sealed