चेअरमनच्या घराची तोडफोड, ठाण्यातून पळालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:29 IST2026-01-09T16:28:51+5:302026-01-09T16:29:47+5:30
बारा तासांत दोन गुन्हे दाखल, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली

चेअरमनच्या घराची तोडफोड, ठाण्यातून पळालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक
छत्रपती संभाजीनगर : वैयक्तिक वादातून दोन साखर कारखान्यांचे चेअरमन व भाजपचे पदाधिकारी सतीश जगन्नाथराव घाटगे (५२, रा. शहानूरवाडी) यांच्या घरात घुसून त्यांचेच नातलग श्यामसुंदर वसंतराव उढाण (४७, रा. गुरुसहानी नगर, एन-४) यांनी चाकूने धमकावत सामानाची नासधूस केली. वाहनाची तोडफोड केली. ६ जानेवारीला मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या प्रकारानंतर उढाण यांनी पोलिस ठाण्यातून पळ काढला होता. त्यात पोलिसांनी त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करून गुरूवारी अटक केली.
दि. ६ रोजी मध्यरात्री उढाण यांनी घाटगे यांच्या घराचे सेंट्रल लॉक तोडून प्रवेश केला. तोडफोड केली. तळमजल्यावरुन शिवीगाळ करुन त्यांनी घाटगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस पोहोचल्यानंतरही त्यांनी हातातील शस्त्राने कारच्या काचा फोडल्या. हा सर्व प्रकार करताना उढाण नशेत होते, असेही तक्रारीत नमूद आहे. जवाहरनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात बसवले. त्यानंतर घाटगे यांच्या तक्रारीवरून उढाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बारा तासांत दोन गुन्हे दाखल
पोलिसांनी ताब्यात घेऊन उढाण यांना पोलिस ठाण्यात नेऊन बसवले. पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडत होते. मात्र, त्याचवेळी अटकेच्या भीतीने उढाण यांनी लघुशंकेचा बहाणा करून ठाण्यातून पळ काढला होता. याप्रकरणी अंमलदार राजू पवार यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घाटगे यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात गुरुवारी जवाहरनगर पोलिसांनी उढाणचा शोध घेऊन अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले.