छत्रपती संभाजीनगर : राज्यात अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. हवामानातील तीव्र चढ-उतारामुळे बऱ्याच जणांना मायग्रेन म्हणजेच डोकेदुखी सुरू होते. याला मराठीत अर्धशिशी किंवा माथेशूळ असे म्हणतात. हा आजार नसून, त्या व्यक्तीची प्रकृती आहे आणि प्रकृतीमधील सर्व घटकांचा यावर प्रभाव पडतो.मायग्रेन स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मायग्रेन म्हणजे काय, कशामुळे जडतो आजार?मायग्रेन हा एक एपिसोडिक (आकस्मिकपणे येणारा) विकार आहे. ज्यामध्ये मुख्य लक्षण म्हणजे तीव्र डोकेदुखी असून, त्यासोबत साधारणपणे मळमळ किंवा प्रकाश व आवाजावरील संवेदनशीलता आढळते. हा विकार न्यूरॉलॉजिस्टना त्यांच्या दैनंदिन वैद्यकीय व्यवहारात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणाऱ्या तक्रारींपैकी एक आहे.
वातावरण बदलामुळे मायग्रेन ‘ट्रिगर’काही पर्यावरणीय घटक संवेदनशील व्यक्तींमध्ये मायग्रेनचा झटका सुरू करणे किंवा वाढवणे यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामध्ये हवामानातील बदल, तीव्र किंवा लुकलुकणारा प्रकाश, प्रदूषण, धूळ किंवा ॲलर्जन्स, आदी बाबी कारणीभूत ठरतात.
जीवनसत्त्वांची कमतरताजीवनसत्त्वांची कमतरता हे मायग्रेनचे एकमेव कारण नाही, पण संशोधनानुसार काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे मायग्रेन होण्याचा धोका किंवा झटक्यांची वारंवारता वाढू शकते.
अपुरी झोप, ताण, वाढता स्क्रीनटाइम, जंक फूडझोपेचा अभाव, जंक फूड, ताण आणि स्क्रीन टाइम हे मायग्रेनचे ट्रिगर घटक म्हणून ओळखळे जातात. त्यामुळे याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावामायग्रेन स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. गर्भनिरोधक किंवा पाळी पुढे करण्यासाठी गोळ्या घेत असणाऱ्या स्त्रियांनी डोके दुखत असल्यास लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा. आधुनिक उपचारपद्धतीने या डोकेदुखेमुळे होणारा त्रास कमी करता येतो; पण योग्य जीवनशैली हा यावरचा खरा उपाय आहे.- डाॅ. मकरंद कांजाळकर, न्यूरो फिजिशियन
औषधींसह जीवनशैलीतील बदल महत्त्वपूर्ण‘मायग्रेन’चा त्रास कमी करण्यासाठी औषधींसह जीवनशैलीतील बदल, फिजिकल ॲक्टिव्हिटी महत्त्वपूर्ण ठरते. काही वातावरणातील बदलाने, काहींना उन्हात गेल्याने, काहींना काही खाल्ल्याने डोकेदुखी उद्भवते. त्यामुळे ज्या गोष्टीमुळे त्रास होतो, ती गोष्ट बंद केली पाहिजे.- डाॅ. पांडुरंग वट्टमवार, मेंदूविकारतज्ज्ञ