आधी एटीएम मशीन बिघडवली; कार्ड अडकताच मदतीच्या बहाण्याने अधिकाऱ्याचे पैसे हडप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:34 IST2025-12-03T19:34:26+5:302025-12-03T19:34:57+5:30
चिकलठाण्यात विमान कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला गंडा; अज्ञात क्रमांकावरून फसवणूक झाल्याचा आश्चर्यकारक कॉलही

आधी एटीएम मशीन बिघडवली; कार्ड अडकताच मदतीच्या बहाण्याने अधिकाऱ्याचे पैसे हडप
छत्रपती संभाजीनगर : एटीएम मशीनमध्ये आधीच बिघाड करून ठेवत नंतर आलेल्या ग्राहकाचे त्यात कार्ड अडकताच मदतीच्या बहाण्याने त्याला बाहेर पाठवून पैसे लुटले जात आहे. एका बड्या विमान कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची सोमवारी चिकलठाण्यात फसवणूक करत टोळीने ४३ हजार रुपये ढापले.
संजय जाधव (रा. वरुड फाटा ) हे सोमवारी सकाळी १०.३० वाजता चिकलठाण्यातील एसबीआयच्या एटीएममध्ये गेले. आधीच एक इसम आत होता. जाधव यांनी कार्डद्वारे एक हजार रुपये काढले. मात्र, त्यांचे कार्ड आतच अडकले. दहा मिनिटे प्रयत्न करूनही कार्ड निघाले नाही. तेव्हा त्या इसमाने त्यांना ‘तुम्ही मुकुंदवाडी सिग्नलवर एक एटीएम आहे, तेथे जाऊन सुरक्षारक्षकाला सांगा, तो इकडे येऊन कार्ड काढून देतो’ असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत जाधव बाहेर पडले. रस्ता ओलांडेपर्यत त्यांना निनावी, क्रमांक दिसत नसलेला कॉल आला. त्याने त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर होत असल्याचे सांगितले. जाधव यांनी परत एटीएमकडे धाव घेतली.
इसम गायब, कार्डही लंपास
तोपर्यंत त्यांना तो इसम व त्यांचे अडकलेले कार्डही गायब होते. त्यांनी खाते तपासले असता ४३ हजार रुपये गेल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार घडेपर्यंत चोराने २.६ किलोमीटर अंतरावरील धूत रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एटीएममधून त्यांच्या कार्डद्वारे ते पैसे लंपास केले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी फसवणूक केल्याचा अंदाज
चोरट्यांनी आधीच एटीएममध्ये बिघाड करून कार्ड अडकवण्यासाठी पट्टीसदृश वस्तू वापरली. अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत. निनावी क्रमांकावरून मुद्दाम गोंधळून टाकणारा कॉल केला. सोबत उभे असताना हेरलेल्या पासवर्डच्या मदतीने दुसऱ्या सेंटरमध्ये जाऊन कार्डद्वारे पैसे काढले.
एटीएम सेंटरमध्ये जाताना हे लक्षात ठेवा
-एटीएममध्ये कार्ड अडकल्यास, व्यवहार थांबल्यास कोणाच्याही मदतीवर विश्वास ठेवू नये. सेंटरही सोडू नका.
-तत्काळ बँकेच्या अधिकृत हेल्पलाईनवर कॉल करून मदत मागावी व कार्ड ब्लॉक करावे.
-एटीएममध्ये की-पॅड झाकूनच पिन टाकावा; कोणालाही पिन सांगू नये.
-आत आधीच कोणी उभे असल्यास व्यवहार करू नये.
-एटीएम सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यास बाहेर पडून दुसरे एटीएम वापरावे.