छ. संभाजीनगरमध्ये भरवस्तीत हॉस्पिटलच्या ICU ला आग; मृत्यूच्या दाढेतून १० रुग्ण बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:40 IST2026-03-30T13:37:53+5:302026-03-30T13:40:04+5:30

रुग्णालयातील एसीला आग, व्हेंटिलेटरसह लाखो रुपयांचे साहित्य खाक.

Fire breaks out in ICU of crowded Gajanan hospital in Chhatrapati Sambhajinagar; 10 patients escape death | छ. संभाजीनगरमध्ये भरवस्तीत हॉस्पिटलच्या ICU ला आग; मृत्यूच्या दाढेतून १० रुग्ण बचावले!

छ. संभाजीनगरमध्ये भरवस्तीत हॉस्पिटलच्या ICU ला आग; मृत्यूच्या दाढेतून १० रुग्ण बचावले!

छत्रपती संभाजीनगर : गजानन महाराज मंदिर चौकातील गजानन हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरला रविवारी (दि. २९) रात्री पावणे आठच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटना घडली त्यावेळी आयसीयूमध्ये पाच तर जनरल वॉर्डमध्ये पाच असे एकूण दहा रुग्ण ॲडमिट होते. आग लागल्याचे कळताच रुग्णालय प्रशासनाने सर्व रुग्णांना तातडीने शहरातील अन्य खासगी रुग्णालयात ६ ॲम्ब्युलन्समधून हलविले. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. फायर ब्रिगेड जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

गजानन महाराज मंदिर चौकातील गजानन हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या आयसीयूमधील एसीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत आयसीयूतील पडदे आणि कर्टन, गाद्याने पेट घेतला. ही बाब निदर्शनास येताच उपस्थित डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व एकूण १० रुग्ण बाहेर काढून रुग्णवाहिकेतून शहरातील अन्य खासगी रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबासह घटनास्थळी धाव घेतली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत प्रयत्न सुरू होते. शेवटी आयसीयू युनिटच्या काचा फोडण्यात आल्यानंतर तेथे पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत आयसीयूतील सर्व व्हेंटिलेटर मॉनिटर, एक्स रे मशीन, फर्निचर, आणि अन्य साहित्याचे नुकसान झाले.

फायर एनओसी सिस्टीम आहे
रुग्णालयातील आयसीयूमधून धूर निघू लागल्याचे दिसताच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयातील रुग्ण वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. फायर ब्रिगेड लगेच दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. आमच्या रुग्णालयात फायर एनओसी, फायर फायटिंग सिस्टीम आहे.
-- डॉ. गितेश दळवी, रुग्णालयाचे संचालक

.... यांनी मिळवले नियंत्रण
मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, विजय राठोड, जवान रमेश सोनवणे, दीपराज गंगावणे, छत्रपती कंकणे, अशोक पोटे, शेख समीर, संग्राम मोरे, सचिन शिंदे, रवी दुथे, अमिताभकराड यांनी दोन अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

त्रुटी असणाऱ्यांना नोटीस
या रुग्णालयाकडे फायर एनओसी, यंत्रणा आहे. आगीच्या घटना घडू नये, या दृष्टीने तपासणी सुरू केली आहे. त्रुटी आढळलेल्या दोन ते तीन रुग्णालयांना नोटीस बजावल्या आहेत.
डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

१० दिवसांपूर्वीच 'लोकमत'ने वेधले होते लक्ष
ओडिशातील कटक येथील ट्रॉमा आयसीयूमधील आगीत दहा रुग्णांचा मृत्यूची घटना घडली. या घटनेनंतर 'लोकमत'ने १९ मार्चला 'जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करीत रुग्णालयांच्या स्थितीकडे लक्ष वेधले होते. अनेक रुग्णालयांनी अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याची कागदपत्रे यंत्रणेला सादर केलेली नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. त्यातून अशा घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में अस्पताल के आईसीयू में आग: 10 मरीजों को बचाया गया!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर के एक अस्पताल के आईसीयू में शॉर्ट सर्किट से आग लग गई। दस मरीजों को सुरक्षित रूप से दूसरे अस्पतालों में पहुंचाया गया। दमकल कर्मियों ने आग पर काबू पाया, जिससे कोई हताहत नहीं हुआ, हालांकि आईसीयू को काफी नुकसान हुआ। अस्पताल में आग सुरक्षा उपाय थे।

Web Title : Hospital ICU Fire in Chhatrapati Sambhajinagar: 10 Patients Rescued!

Web Summary : A fire broke out in the ICU of a Chhatrapati Sambhajinagar hospital due to a short circuit. Ten patients were safely evacuated to other hospitals. Firefighters controlled the blaze, preventing casualties, though the ICU suffered significant damage. The hospital had fire safety measures in place.