वेल्डिंग सुरू असताना आगीचा भडका; पैठणच्या इनकोर कंपनीतील आगीत ३ कामगार होरपळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:40 IST2025-04-26T18:39:33+5:302025-04-26T18:40:56+5:30
एक कामगार आगीत अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांहून अधिक काळ प्रयत्न करून शोधून घेतले

वेल्डिंग सुरू असताना आगीचा भडका; पैठणच्या इनकोर कंपनीतील आगीत ३ कामगार होरपळले
पैठण/जायकवाडी : पैठण औद्योगिक वसाहतीतील इनकोर हेल्थकेअर कंपनीत शनिवारी (दि. २६) दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीच्या वरील मजल्यावर एसी डक्टिंग विभागात वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाले असून त्यांना तातडीने पैठण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, एक कामगार आगीत अडकला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तीन तासांहून अधिक काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. खास मास्क आणि युनिफॉर्म परिधान करून जवानांनी धुराने भरलेल्या परिसरात प्रवेश करून अखेर जखमी अवस्थेत त्या कामगाराला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात हलवले.
आग विझवण्यासाठी तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. मोठ्या प्रमाणात धुरामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.