- बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामाच्या तोंडावर खत टंचाई आणि दरवाढीच्या अफवेने शेतकऱ्यांनी एप्रिलपासूनच खत खरेदीस सुरुवात केली आहे. याच काळात खत विक्रेत्यांकडून गैरव्यवहार झाल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत उघड झाले. २० पेक्षा अधिक खताच्या गोण्या खरेदी दाखविण्यात आलेल्या ३१३ शेतकऱ्यांकडे प्रत्यक्षात खतच आढळून न आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विभागातील ५३९ खत विक्रेत्यांना कृषी विभागाकडून नोटिसा बजावल्या आहेत.
खरिपासाठी दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर रासायनिक खतांची खरेदी करीत असतात. यंदा मात्र आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक महिना आधीच शेतकऱ्यांनी खत खरेदी सुरू केली आहे. गत महिन्यात सरासरीपेक्षा तीन ते चार पट युरिया आणि डीएपी खताची विक्री झाल्याचे आकडे कृषी विभागाला प्राप्त झाले.
१,५७२ शेतकऱ्यांकडे पडताळणी
यानंतर विभागाने २० पेक्षा अधिक खताच्या गोण्या खरेदी केेलेल्या जालना,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल १,५७२ शेतकऱ्यांच्या नावाची यादी मिळविली. यादीतील प्रत्येक शेतकऱ्यांना भेटून त्यांनी रासायनिक खत खरेदी केले का, त्यांच्याकडे किती एकर जमीन आहे, कोणते पिक सध्या शेतात आहे आणि कोणते घेणार आहे, याविषयी माहिती जाणून घेण्याची सूचना प्रत्येक जिल्हा अधीक्षक कृषी विकास अधिकारी यांना देण्यात आले होते.
आधार, फार्मर आयडीचा परस्पर वापर...
नुकतीच १५७२ शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आली. तेव्हा ३१३ शेतकऱ्यांकडे रासायनिक खत आढळून आले नाही. त्यांच्या नावे ई पॉज मशिनवर अनुदानित खत नेल्याची नोंद आहे. शेतकऱ्यांचे आधारकार्ड, फार्मर आयडी कृषी सेवा केंद्रचालकाकडे असते, याचा परस्पर वापर करून त्यांना खत विक्री केल्याचे दाखवून मोठा घोटाळा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ३१३ शेतकऱ्यांच्या तब्बल ६२६० गोण्या खताची काळाजाबाजारात विक्री झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने ५३९ खत विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
विक्रेत्यांना नोटिसा धाडल्या
रासायनिक खताच्या बाबतीत कृषी विभाग खूप संवेदनशील आहे. अनुदानित रासायनिक खताचा तुटवडा निर्माण होऊ नये, तसेच प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक तेवढे खत मिळावे, यासाठी आम्ही वॉच ठेवून आहोत. मागील महिन्यात युरिया आणि डीएपीची अधिक प्रमाणात विक्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही विभागातील २०पेक्षा अधिक गोण्या खत घेतलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी केली, तेव्हा ३१३ शेतकऱ्यांकडे खत आढळले नाही. विक्रेत्यांना नोटिसा धाडल्या आहेत.
-सुनील वानखेडे, विभागीय कृषी सहसंचालक.
Web Summary : A fertilizer scam has been uncovered where subsidized fertilizer was sold under 313 farmers' names, but no stock was found with them. 539 vendors received notices.
Web Summary : एक खाद घोटाले का पर्दाफाश हुआ है जिसमें 313 किसानों के नाम पर सब्सिडी वाली खाद बेची गई, लेकिन उनके पास कोई स्टॉक नहीं मिला। 539 विक्रेताओं को नोटिस जारी किए गए।