जुनाट ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा घाट

By Admin | Updated: August 19, 2014 02:17 IST2014-08-19T01:59:59+5:302014-08-19T02:17:08+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद मॉडेल रेल्वेस्थानकामध्ये दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. सध्या स्थानकाच्या जुन्या इमारतीत ९ सीसीटीव्ही कॅमेरे असून,

The ferry to set up the old CCTV | जुनाट ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा घाट

जुनाट ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा घाट




औरंगाबाद : औरंगाबाद मॉडेल रेल्वेस्थानकामध्ये दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. सध्या स्थानकाच्या जुन्या इमारतीत ९ सीसीटीव्ही कॅमेरे असून, नवीन इमारतीसह स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी जवळपास ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. परंतु प्रत्यक्षात नवीन आणि अत्याधुनिक कॅमेरे बसविण्याऐवजी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील स्थानकातील काढलेले जुनाट कॅमेरे मॉडेल रेल्वेस्थानकात बसविण्याचा घाट घातला जात आहे.
मॉडेल रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीत कामकाज सुरू होऊन मोठा कालावधी होऊनही अद्याप याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असताना दक्षिण मध्य रेल्वेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. रेल्वेस्थानकात चोरट्यांचा वावर असल्याने प्रवाशांच्या बॅग्ज, पाकिटे, दुचाकी आदींची चोरी तसेच संशयित व्यक्ती, अन्य वस्तूंबाबत सतर्क राहून त्याबाबत तात्काळ योग्य ती पावले उचलण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरतात. रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत विविध ठिकाणी ९ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शिवाय जुन्या इमारतीत सीसीटीव्ही रूमदेखील आहे. परंतु नव्या इमारतीत कॅमेरे नसल्याने परिसराची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची स्थिती दिसून येते. त्यामुळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत; परंतु जुनाट कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने त्यांचा कितपत उपयोग होईल, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नांदेड रेल्वेस्थानकातील कॅमेरे?
नांदेड रेल्वेस्थानकात नुकतेच अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथील पूर्वीचे कॅमेरे औरंगाबाद स्थानकात बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय मे महिन्यात औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या पाहणी दौऱ्यात दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही नांदेड रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली होती.


संशयित व्यक्तींच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचा दर्जा महत्त्वाचा आहे; परंतु जुने कॅमेरे बसविण्यात आल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नवीन आणि आधुनिक कॅमेऱ्यांची गरज आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष क रून अन्य स्थानकातून काढलेले कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता माहिती देता येणार नाही, जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे सांगण्यात आले.

Web Title: The ferry to set up the old CCTV