मदतीचे आश्वासन फोल, शेतकऱ्यांनी सोयगावात तहसीलला कुलूप; गंगापुरात ‘पोतराज आंदोलन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:02 IST2025-10-30T18:01:49+5:302025-10-30T18:02:37+5:30
दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन फोल ठरल्याने संताप; सरकारविरोधी घोषणाबाजीने वातावरण तापले

मदतीचे आश्वासन फोल, शेतकऱ्यांनी सोयगावात तहसीलला कुलूप; गंगापुरात ‘पोतराज आंदोलन’
सोयगाव/गंगापूर: छत्रपती संभाजीनगर: अतिवृष्टीतील नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा होऊनही मदत दिली जात नसल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळत चालला आहे. बुधवारी गंगापूर आणि सोयगाव तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले. सोयगावात तब्बल ४ तास शेतकऱ्यांनी तहसीलला कुलूप ठोकून कार्यालय बंद पाडले तर गंगापुरात तहसील कार्यालयासमोर पोतराजाच्या वेशात डफ वाजवून स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके मारत अनोखे आंदोलन करण्यात आले.
डफ वाजवत पोतराजाच्या वेशात पोहोचला शेतकरी
गंगापूर : राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई न मिळाल्याने व शासकीय मका खरेदी केंद्र चालू करण्याच्या मागणीसाठी असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी दुपारी येथील तहसील कार्यालयासमोर पोतराजाच्या वेशात डफ वाजवून अनोखे आंदोलन करण्यात आले.
पोतराजाच्या वेशात आलेल्या शेतकऱ्याने डफ वाजून व स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके मारीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला. तालुक्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे बाकी असलेले अनुदान, तसेच चालू वर्षातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान त्वरित देण्यात यावे व मका हमीभाव केंद्र सुरू करावे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी शिंदेसेनेचे बाळासाहेब चव्हाण, शेतकरी नेते तथा असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रदीप चव्हाण, ग्राम संवाद सरपंच संघटनेचे राज्यसचिव विशाल लांडगे, गणेश चव्हाण, उत्कर्ष चव्हाण, गणेश चव्हाण, राजू बारवाल, राहुल चव्हाण, किरण राऊत, अमोल चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.