मुलीला भेटून परतणारा शेतकरी पुरात बैलगाडीसह वाहून गेला; १२ तासांनी सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:17 IST2025-06-18T18:16:41+5:302025-06-18T18:17:28+5:30
अलापूरच्या शेतकऱ्याचा १२ तासांनंतर सापडला मृतदेह

मुलीला भेटून परतणारा शेतकरी पुरात बैलगाडीसह वाहून गेला; १२ तासांनी सापडला मृतदेह
कन्नड : तालुक्यातील जैतापूर ते हतनूर मार्गावरील वाघनाल्यात बैलगाडीसह सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास काही अंतरावर आढळला. कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६ वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
अलापूर येथील कैलास कोरडे हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी पळसवाडी येथे सोमवारी सकाळी १० वाजता बैलगाडी घेऊन गेले होते. तेथून परतत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वाघनाला पार करताना पुरामध्ये ते बैलगाडीसह वाहून गेले. यामध्ये एका बैलाचा बुडून मृत्यू झाला, तर दुसरा बैल जोते तुटल्याने पाेहून बाहेर आला. ही बाब लक्षात येताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन शोधमाेहीम सुरू केली. स्थानिकांनी गळ टाकून बैलगाडी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढली.
मात्र, कैलास कोरडे यांचा शोध लागला नव्हता. याबाबत माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी नायब तहसीलदार दिलीप सोनवणे व देवगाव रंगारी पोलिस यांच्या उपस्थितीत त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; परंतु ते सापडले नव्हते. मंगळवारी सकाळी ६ वाजता घटनास्थळपासून काही अंतरावर पाण्यावर तरंगताना कोरडे यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर बाळू परांडे, उमेश कोरडे आदींनी तो पाण्याबाहेर काढला. त्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. दुपारी १२ वाजता कोरडे यांच्या पार्थिवावर जैतापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
पिशवीत आढळली रक्कम अन् कपडे
कैलास कोरडे यांच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या हातात एक पिशवी दिसून आली. त्यात १५ ते २० हजार रुपयांच्या दोन रुपयांच्या नोटा, काही कागदपत्रे व अंगातील बदलेले जुने कपडे आढळल्याची माहिती येथील ग्रामस्थ बाळू परांडे यांनी दिली.