प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्या सापडली; औरंगाबादमधून पोहोचली थेट मध्य प्रदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 14:48 IST2022-09-10T14:46:55+5:302022-09-10T14:48:16+5:30
पोलिसांनी तत्काळ तपास करत काढले शोधून, इटारसी रेल्वे स्टेशनवर आली आढळून आली

प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्या सापडली; औरंगाबादमधून पोहोचली थेट मध्य प्रदेशात
औरंगाबाद: रागाच्या भरात शुक्रवारी दुपारी घरातून निघून गेलेली प्रसिद्ध युट्यूबर बिनधास्त काव्या अखेर सापडली आहे. मध्य प्रदेश येथील इटारसी रेल्वे स्टेशनवर ती आढळून आली. काव्या औरंगाबादमधून थेट मध्य प्रदेशात पोहोचली. इटारसी रेल्वे स्टेशनवरून तिला परत आणण्याची पोलीस प्रक्रिया सुरु आहे.
१६ वर्षांची बिनधास्त काव्या प्रसिद्ध युथट्युबर आहे. आईवडील अभ्यासावरून रागावल्याने शुक्रवारी दुपारपासून काव्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा मोबाईल देखील घरीच होता. यासंबंधी छावणी पोलिसांत मिसिंगची तक्रार आई वडिलांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता सरांनी माहिती घेऊन तात्काळ भोपाळ पोलिसांशी संपर्क साधला. अखेर काही तासांत तिला शोधण्यात यश आले. इटारसी रेल्वे स्टेशनवर काव्या आढळून आली.
आई वडिलांनी केले होते आवाहन
'आमची मदत करा. काव्याला सर्व जण ओळखतात. तिचा मोबाईल पण आमच्या जवळ आहे. तिच्याकडे केवळ दोनच हजार रुपये आहे. शुक्रवारी दुपारीपासून काव्या घरी परतली नाही. तिच्याबद्दल माहिती मिळाली तर आम्हाला छावणी पोलिसांना कळवा.', अशी आर्जव करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्याच्या आईवडिलांनी शेअर केला होता. ते दोघेही दिवसरात्र तिला शोधत होते.
५ मिलिअन्स पेक्षा अधिक आहेत फॉलोअर्स
बिनधास्त काव्या तिच्या नटखट स्वभावामुळे सर्वांची आवडती आहे. लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांमध्येही तिचे रील्स चांगलेच लोकप्रिय आहेत . तिचे युट्यूबवर साडेचार मिलियन पेक्षाजास्त तर इंस्टाग्रामवर १ मिलिअन फॉलोअर्स आहेत.