छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमणास मज्जाव केल्याने कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:24 IST2025-08-22T18:22:30+5:302025-08-22T18:24:57+5:30
या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमणास मज्जाव केल्याने कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: मालकीच्या मोकळ्या भूखंडावर दादागिरी करून अतिक्रमण करण्यास मज्जाव केल्याने एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी सिडको एन-६ येथील संभाजी कॉलनी येथे आज दुपारी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आजोबा आणि नातू यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
रमेश पाडसवान हे आपल्या कुटुंबासह सिडको एन-६ मधील संभाजी कॉलनी येथे राहतात. त्यांचे किराणा दुकान आहे. घराच्या समोरच एक मोकळा भूखंड पाडसवान कुटुंबाने सिडकोकडून रीतसर खरेदी केला आहे. मात्र, या भूखंडावर डोळा असलेल्या निमोने कुटुंबाने येथे अतिक्रमण सुरू केले. रमेश पाडसवान, त्यांचा मुलगा प्रमोद आणि नातू रुद्र यांनी याला विरोध केला. मात्र, काशीनाथ निमोने, ज्ञानेश्वर निमोने, सौरभ निमोने, गौरव निमोने यांनी पाडसवान कुटुंबाला त्रास देणे सुरू केले.
दरम्यान, पाडसवान यांनी मोकळ्या भूखंडावर बांधकाम सुरू करण्यासाठी साहित्य आणले असताना निमोने कुटुंब येथे शेड उभारत होते. याप्रकरणी आज दुपारी काही राजकीय पदाधिकारी यांनी बैठक घेत गणपती महोत्सव असल्याने वाद नको अशी भूमिका घेतली. मात्र, बैठकीच्यानंतर काही वेळातच निमोने कुटुंबातील काशीनाथ, ज्ञानेश्वर, सौरभ आणि गौरव यांनी पाडसवान यांच्यावर चाकू, रॉडने हल्ला चढवला. यात पाडसवान कुटुंबातील रमेश, प्रमोद आणि रुद्र हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान प्रमोद ( ३८) यांचा मृत्यू झाला. तर रमेश पाडसवान तर रुद्र हे गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.