दिवाळीनंतर राजकीय फटाक्यांचा धमाका; स्वबळ, युतीच्या लवंगी फटाक्यांचा सध्या आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:07 IST2025-10-20T14:01:42+5:302025-10-20T14:07:33+5:30
१० ऑक्टोबरनंतर १६ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडून पक्षाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला.

दिवाळीनंतर राजकीय फटाक्यांचा धमाका; स्वबळ, युतीच्या लवंगी फटाक्यांचा सध्या आवाज
- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढायचे की एकत्रित मैदानात उतरायचे, याचा धमाका होईल. परंतु, सध्या भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व इतर पक्षांच्या महायुतीमध्ये स्वबळाचे लवंगी फटाके फुटू लागले आहेत. त्या लवंगी फटाक्यांचा आवाज जरी कमी असला तरी राजकीय मैदानात त्यावरून चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या आहेत. १७ दिवसांत महायुतीच्या नेत्यांच्या तीन महत्त्वाच्या बैठका, मेळावे शहरात पार पडले आहेत. यात भाजपने विभागीय बैठका घेतल्या तर शिंदेसेनेने गटप्रमुखांचा मेळावा घेतला.
शिंदेसेनेचा मेळावा
ऑक्टोबर महिन्यात शिंदेसेनेने गटप्रमुखांचा मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. इच्छुक मोठ्या प्रमाणात, पक्षात येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना सामावून घेण्याची भाषा केली. १० ऑक्टोबर रोजी शिंदे यांनी दिवसभर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. तसेच मुंबईतदेखील दोन बैठका झाल्या.
भाजपची सहा तास बैठक
भारतीय जनता पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात, अशी मागणी नेते, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० ऑक्टोबर रोजी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर कोअर कमिटीने युतीत लढायचे की स्वबळावर लढायचे; याचा निर्णय घ्यावा असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील ९० दिवसांतील कामांसाठी पदाधिकाऱ्यांना टार्गेट दिले.
आधी सर्व्हे मग ठरवू
१० ऑक्टोबरनंतर १६ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडून पक्षाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. सर्वांची स्वबळाची भाषा असली तरी सर्व्हेअंतीच ती अपेक्षा पूर्ण होईल, असे चव्हाण यांनी सांगितले. मराठवाड्यातील सर्व नेते, आमदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली.
राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबईत दोन बैठका या महिन्यात झाल्या आहेत. सर्व जिल्हाप्रमुख बैठकीला होते. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे त्यात सांगण्यात आले आहे. भाजप मोठा भाऊ आहे. त्यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही. युती झाली तर ठीक नाहीतर स्वबळावर तयारी करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत.
महायुती की स्वबळ, पदाधिकारी काय म्हणतात?
स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या प्राथमिक सूचना असल्या तरी विजयाचे समीकरण पाहून निर्णय होईल.
- किशोर शितोळे, शहराध्यक्ष भाजप
स्थानिक पातळीवर निर्णय
नगरपालिका निवडणुकीत स्थानिक नेत्यांची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे ठरले आहे. उर्वरित संस्थांबाबत अद्याप काही निर्णय नाही.
- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख शिंदेसेना
युती झाली तर ठीक नाहीतर...
युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवू, तसेही पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अभिजित देशमुख, रा.काँ.पा. अजित पवार गट