गंगापुरात विहिरीत शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 19:25 IST2022-05-17T19:25:30+5:302022-05-17T19:25:42+5:30
तालुक्यातील मांजरी येथील मादलपूर शिवारातील विहिरीत आढळला मृतदेह

गंगापुरात विहिरीत शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
गंगापूर : वैजापूर मार्गावर मांजरी शिवारातील तळ्याच्या कडेला असलेल्या विहिरीत एका पुरुषाचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरातील जुना बस्थानक परिसरातील बेपत्ता इसमाचा हा मृतदेह असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
तालुक्यातील मांजरी येथील मादलपूर शिवारातील गट क्रमांक ४५ मध्ये महेंद्र सुराशे यांचे शेत आहे. आज मंगळवारी (दि.१७) सकाळी दहा वाजेच्या सुमारास सुराशे शेतात गेले होते. यावेळी त्यांना विहिरीत पुरुषाचा शीर नसलेला नग्न अवस्थेतील मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी याची माहिती पोलीस पाटीलांमार्फत पोलिसांना दिली.
यावरून पोनि संजय लोहकरे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरातील मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेहाचे शीर शोधण्यासाठी परिसर पिंजून काढला मात्र यश मिळाले नाही. दरम्यान, शहरातील एक ५० वर्षीय इसम बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी सकाळीच दिली होती.
विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या बोटातील अंगठीवरून मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचे बेपत्ता इसमाच्या मुलाने सांगितले. मात्र, मृतदेहाचे गायब शीर मिळत नाही तोपर्यंत ठामपणे काहीच उलगडा होणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ज्या विहिरीत मृतदेह आढळला त्यातच शीर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.