महिन्याला दोन लाखांचे हप्ते देतो, तरी कारवाई केली तर ठोकून काढू; वाळू तस्करांची मुजोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:45 IST2025-02-14T17:44:09+5:302025-02-14T17:45:40+5:30
नदी पात्रातून वाळू उपसा करण्यापूर्वी पोलिस, महसूल पथकातील अधिकारी कुठे आहेत? ऑफिसमधून कधी निघाले? कधी झोपले? याचे सर्व लोकेशन वाळू तस्करांकडे असते.

महिन्याला दोन लाखांचे हप्ते देतो, तरी कारवाई केली तर ठोकून काढू; वाळू तस्करांची मुजोरी
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यातील पूर्णा, अंजना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करू देण्यासाठी महसूल, पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, आरटीओ, पोलिसांचे विविध विशेष पथक, याशिवाय काही विशेष व्यक्तींचे एजंट यांना एका हायवा चालकाकडून महिन्याला दोन लाख रुपये, तर ट्रॅक्टरचालककडून १ लाख ८० हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. त्यामुळे हप्ता घेऊन कारवाई केली तर संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना असेच ठोकून काढू, असा इशारा काही वाळू तस्करांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिला.
अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सिल्लोड तहसीलच्या पथकावर बुधवारी रात्री वाळू तस्करांनी हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर वाळू तस्करांशी संपर्क साधला असता त्यांनी या धंद्याचे काळे गुपीत उघड केले. बुधवारी तहसीलच्या पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एकाने मागील महिन्यात वसुली करणाऱ्या महसूल सहायकाला भराडी येथे पार्टी देऊन दारू पाजली अन् २० हजारांची लाच देऊन एसीबीच्या पथकाला पकडून दिले होते आणि योगायोगाने नेमके त्याच वाळू तस्कराचे एक ट्रॅक्टर पुन्हा बुधवारी रात्री पकडण्यात आले होते. एक हायवा पकडला गेला तर सात लाखांचा, ट्रॅक्टर पकडले तर तीन लाखांचा दंड होतो, म्हणून वाळू तस्करांनी बुधवारी रात्री धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे. इतका उद्रेक वाळू तस्करांनी का केला याचे चिंतन प्रशासनाला करावे लागणार आहे.
साहेब कधी, कोठे जातात याचे सर्व लोकेशन
नदी पात्रातून वाळू उपसा करण्यापूर्वी पोलिस, महसूल पथकातील अधिकारी कुठे आहेत? ऑफिसमधून कधी निघाले? कधी झोपले? याचे सर्व लोकेशन वाळू तस्करांकडे असते. याशिवाय नदीपात्रात जाणाऱ्या सर्व रस्त्यावर त्यांचे पंटर तैनात असतात. महसूल आणि पोलिस प्रशासनाला बारकाईने नियोजन करून कठोर कारवाई करावी लागणार आहे. तसेच प्रशासनातील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शोधावे लागणार आहे.
१२० ट्रॅक्टर, २५ हायवांचा वापर
सिल्लोड तालुक्यातील धानोरा, दिडगाव, खातखेडा, भवन, वांजोळा, उपळी, अनवी, डोंगरगाव, केऱ्हाळा, पिंपळगावपेठ, चिंचखेडा, कोटनांद्रा, पळशी येथील पूर्णा, अंजना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून वाहतुकीसाठी १२० ट्रॅक्टर २५ हायवांचा वापर केला जात आहे. या वाळू माफियांना पोलिस, महसूल, आदी एकाही यंत्रणेचा धाक नाही. त्यामुळे ते बिनदिक्कत वाळू, उपसा, वाहतूक करतात.
गुरुवारीही बिनधास्त उपसा
बुधवारी रात्री महसूलच्या पथकावर हल्ला करून अधिकारी, कर्मचारी बसलेल्या शासकीय वाहनावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केल्यानंतरही गुरुवारी दिवसभर दिडगाव, केऱ्हाळा, अन्वी, उपळी, खांडगाव, खातखेडा, धानोरा, खोडकाईवाडी येथील नदीपात्रातून वाळू उपसा व वाहतूक सुरूच होता.