चायनीज मांजा, प्लॅस्टिक पतंगामुळे पर्यावरणाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:53+5:302021-01-13T04:10:53+5:30

श्यामकुमार पुरे सिल्लोड : चायनीज मांजा व प्लॅस्टिक पतंग पर्यावरणाची हानी करत आहे. यामुळे पतंगमुक्त संक्रांत साजरी करून ...

Environmental damage caused by Chinese cats, plastic moths | चायनीज मांजा, प्लॅस्टिक पतंगामुळे पर्यावरणाची हानी

चायनीज मांजा, प्लॅस्टिक पतंगामुळे पर्यावरणाची हानी

श्यामकुमार पुरे

सिल्लोड : चायनीज मांजा व प्लॅस्टिक पतंग पर्यावरणाची हानी करत आहे. यामुळे पतंगमुक्त संक्रांत साजरी करून आकाशात संचार करणारे पक्षी वाचवा, असे आव्हान अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे.

सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान या संस्थेतर्फे "पतंग मुक्त आकाश" हा उपक्रम शालेय व सामाजिक स्तरावर राबविण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष किरण पा. पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व शाळांना पतंग फेस्टिव्हल आयोजित न करण्याबद्दल व मुलांनी पतंग उडवू नये याबाबत लेखिपत्र देऊन जनजागृती केली.

सद्या सर्वत्र प्लॅस्टिकचेच पतंग दिसत आहे व हे कमी जाडीचे आहेत ते लवकर फाटतात. पर्यायाने पतंग शौकिन ते वारंवार खरेदी करून प्लॅस्टिक कचरा वाढवित आहेत. महाराष्ट्रात तर प्लॅस्टिक बंदीच असूनदेखील प्लॅस्टिक कॅरिबॅग्सची सर्रास विक्री केली जात आहे. पतंगाच्या बाबतीत तर पूर्णतः "ढील" दिसून येत आहे.

चायनिज (नॉयलॉन) मांजा हादेखील प्रतिबंधित आहे. गत सप्ताहात राज्यात या धारधार मांज्याने गळा चिरून तीन जणांचा मृत्यू झाला. दरवर्षी हजारो पक्षी या पतंगाच्या दोऱ्याने पंख, मान, पाय कापल्याने गंभीर जखमी होतात. देशात दररोज २६ हजार टन प्लॅस्टिक कचरा बनतो. त्यात आता या प्लॅस्टिकच्या पतंगाच्या कचऱ्याची अधिकची भर पडत आहे. चायनीज मांजा व कोणताही दोरा पक्षांकरिता हानिकारक आहे. ---------------

‘प’ पतंगाचा नव्हे, पर्यावरणाचा

संक्रांत सण पक्षाच्या व मानवी जिवावर बेतत असते. पतंग ही फटाक्यांप्रमाणे आपली संस्कृती नाही. पतंग म्हणजे "झेन" ही चीनची परंपरा आहे. आपण याचे अनुकरण करू नये. आपल्याकडे शाळेत 'प' पतंगाचा शिकविला जातो. आता 'प' पतंगाचा नव्हे, तर 'प' पर्यावरणाचा शिकवावा या साठी आम्ही हा उपक्रम राज्यभर राबवित आहोत.

-डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड

----------------

फोटो :

सिल्लोड शहरात ठिक ठिकाणी इलेक्ट्रीक तारेवर अडकून पडलेले पतंग दिसत आहे.

पतंगाच्या मांज्या मुळे जखमी झालेले कबुतर दिसत आहे. (छाया:-श्यामकुमार पुरे सिल्लोड)

Web Title: Environmental damage caused by Chinese cats, plastic moths