वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक

By Admin | Updated: March 1, 2015 00:09 IST2015-03-01T00:03:39+5:302015-03-01T00:09:46+5:30

औरंगाबाद : शनिवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणासोबत तापमानही घटले. हे वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे

The environment hosts the swine flu | वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक

वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक


औरंगाबाद : शनिवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणासोबत तापमानही घटले. हे वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जोपर्यंत थंड वातावरण आहे, तोपर्यंत स्वाईन फ्लूची साथ अधिक बळावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, आज घाटीतील स्वाईन फ्लू वॉर्डात १२ रुग्णांवर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती घाटी प्रशासनाकडून देण्यात आली.
नववर्षात स्वाईन फ्लू साथीचा उद्रेक झाला. आता ही साथ अधिक भयंकर रूप धारण करीत असल्याचे दिसून येते. स्वाईन फ्लूने शहरात आतापर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.
एन१,एच१ या विषाणूपासून स्वाईन फ्लू होतो. थंड वातावरण या विषाणूसाठी पोषक आहे. त्यामुळे शक्यतो वातानुकूलित यंत्रणा असलेल्या एखाद्या मोठ्या कार्यालयात स्वाईन फ्लू अधिक पसरण्याचा धोका असतो. हिवाळ्यातही स्वाईन फ्लूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात.
दुपारनंतर शहराचे तापमान १६.०४ अंशापर्यंत घसरले. थंड वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूकरिता पोषक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला घाटीतील मेडिसीन विभागातील सहयोगी प्रा. डॉ. जिरवणकर यांनी दिला. ते म्हणाले की, स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना एन-९५ हा मास्क वापरणे शक्य नाही. त्यामुळे निदान प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच घराबाहेर पडताना नाका, तोंडाला दोन किंवा तीन घडीचा रुमाल बांधावा.

Web Title: The environment hosts the swine flu