डिसेंबर २०२६ मध्ये पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक; नव्याने करावी लागणार मतदार नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:10 IST2025-09-30T11:08:53+5:302025-09-30T11:10:12+5:30
आगामी निवडणुकीसाठी २४५ अधिकाऱ्यांची मतदान नोंदणी व इतर कामांसाठी नियुक्ती

डिसेंबर २०२६ मध्ये पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक; नव्याने करावी लागणार मतदार नोंदणी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी व याद्या तयार कराव्या लागणार असून १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या पात्रतेवर पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. डिसेंबर २०२६ मध्ये या मतदारसंघासाठी निवडणूक होईल. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
विभागीय आयुक्तालयात मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर आयुक्तांनी पत्रकारांना माहिती दिली. ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणी ते मतदार प्रसिद्धीपर्यंतच्या पूर्ण कार्यक्रमाची माहिती आयुक्तांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते.
गेल्या निवडणुकीत ३ लाख ५२ हजार ३९६ नोंदणी
२०२० साली झालेल्या निवडणुकीत ३ लाख ५२ हजार ३९६ मतदार नोंदणी झाली होती. ७५० नियमित व ६३ अतिरिक्त मतदान केंद्र होती. आगामी निवडणुकीसाठी २४५ अधिकाऱ्यांची मतदान नोंदणी व इतर कामांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.