उपायुक्तांनीच वाजविला निवडणूक आचारसंहितेचा बिगुल
By Admin | Updated: August 27, 2014 00:14 IST2014-08-27T00:09:52+5:302014-08-27T00:14:47+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील अधिकाऱ्यांचे ज्ञान व नेटवर्क किती उत्तम आहे. याचे गमतीदार उदाहरण आज स्थायी समितीच्या बैठकीत पाहायला मिळाले.

उपायुक्तांनीच वाजविला निवडणूक आचारसंहितेचा बिगुल
औरंगाबाद : महापालिकेतील अधिकाऱ्यांचे ज्ञान व नेटवर्क किती उत्तम आहे. याचे गमतीदार उदाहरण आज स्थायी समितीच्या बैठकीत पाहायला मिळाले.
उपायुक्त रवींद्र निकम यांनीच आज विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होत असल्याचे सांगून बिगुल वाजविला. चुकीच्या माहितीमुळे हा प्रकार घडला असला तरी स्थायी समितीमध्ये होणाऱ्या चर्चेवर त्याचा परिणाम झाला.
मुंबईत राजकीय पत्रकार परिषद सुरू झालेली असताना निवडणूक आयोग आचारसंहितेची घोषणा करीत असल्याचे सांगून उपायुक्त रवींद्र निकम यांनी स्थायी समितीची बैठक २० मिनिटांत गुंडाळण्यास भाग पाडले.
आचारसंहितेचे नाव घेताच सभापतींसह सदस्यांनीही कुठलाही सारासार विचार न करता दणादण प्रस्तावांना मंजुरी देत वंदे मातरम् ते राष्ट्रगीतापर्यंतचा प्रवास २० मिनिटांत आटोपून टाकला.
मंगळवारी दुपारी ३ वा. स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. उपायुक्त २.३५ ला सभागृहात आले. २ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी सभापती व सदस्यांना फोन करून मुंबईत निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत असल्याचे सांगितले. त्यांचा फोन आल्यामुळे सभापती विजय वाघचौरे यांच्यासह सर्व सदस्य सभागृहात पोहोचले. आचारसंहिता लागणार या (चुकीच्या) माहितीमुळे थेट विषय पत्रिकांना मंजुरी देण्याचे ठरले. काशीनाथ कोकाटे, संजय चौधरी या सदस्यांनी चर्चेला आचारसंहितेत काहीही हरकत नसते. असे सांगून चर्चेची मागणी केली. मात्र त्यालाही प्रशासनाने विरोध केला. बैठकीत ऐनवेळी ४१ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. तसेच १०० कोटी रुपयांची एलईडीची निविदाही मंजुरीसाठी येणार होती. मात्र ती निविदा आली नाही.