मनपाच्या इमारतीत आठ दुकाने, तीन कुटुंबांचे अनधिकृत वास्तव्य; पाडापाडीत प्रशासनाला समजले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:28 IST2025-11-20T19:26:46+5:302025-11-20T19:28:07+5:30
दुकानांवर तीन कुटुंबांचे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे वास्तव्य होते. याची चाहूलही मनपाच्या मालमत्ता विभागाला कधी लागली नाही.

मनपाच्या इमारतीत आठ दुकाने, तीन कुटुंबांचे अनधिकृत वास्तव्य; पाडापाडीत प्रशासनाला समजले
छत्रपती संभाजीनगर : पैठणगेट पार्किंगच्या पूर्व दिशेला महापालिकेने इमारत बांधली होती. या इमारतीत आठ दुकाने होती. दुकानांवर तीन कुटुंबांचे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे वास्तव्य होते. याची चाहूलही मनपाच्या मालमत्ता विभागाला कधी लागली नाही. महापालिकेनेही कधी अनधिकृत दुकानधारकांना, निवासस्थान तयार करून राहणाऱ्यांकडे विचारणा केली नाही. बुधवारी कारवाईत हे बिंग फुटले. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या परवानगीनंतर संपूर्ण इमारतच जमीनदोस्त करण्यात आली.
दलालवाडीकडून ते खोकडपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला काही वर्षांपूर्वी मनपाने ही इमारत उभारली होती. व्यावसायिक दृष्टीकोनातून ही इमारत होती. इमारतीत ८ व्यापारी अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत होते. दोन मजले पूर्ण झाल्यावर इमारत रस्त्यात बाधित होत असल्याचे लक्षात आल्यावर बांधकाम अर्धवट सोडण्यात आले होते. त्यामध्ये नागरिकांनी अतिक्रमण करून वास्तव्यही केले. याची खबर मनपाला नसावी म्हणजे आश्चर्यच म्हणावे लागेल.
११० व्यापाऱ्यांना नोटिसा
पैठणगेट परिसरातील ११० व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटीस बजावून मालकीहक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी चार ते पाच मालमत्ताधारकांनीच कागदपत्रे सादर केली. अन्य व्यापाऱ्यांकडे कागदपत्रे नसल्याने कारवाई करण्यात आल्याचे संतोष वाहुळे यांनी सांगितले.
सनी कॉर्नरची न्यायालयात धाव
पैठणगेटच्या कोपऱ्यावर सनी कॉर्नर ही प्रसिद्ध इमारत असून, नवीन विकास आराखड्यानुसार ही संपूर्ण इमारत रस्त्यात बाधित होत आहे. इमारत मालकाकडे बांधकाम परवानगी आहे, मात्र, भाेगवटा प्रमाणपत्र नाही. मनपाने कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली. इमारत मालकाने न्यायालयात धाव घेतल्यामुळे कारवाई टळली. इमारत मालकाने पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही. वरचा मजला अनधिकृत आहे. त्यावर धोकादायक स्थितीत होर्डिंगही लावले आहे, त्यामुळे या इमारतीवर कारवाई करण्याचे मनपाचे नियोजन आहे.
दहा जेसीबी, दोन पोकलेन, शंभर पोलिस
कारवाईसाठी मनपाचे १०० अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभागाचे ११० अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय दहा जेसीबी मशीन, दोन पोकलेन, दहा टिप्पर, दोन रुग्णवाहिका, दोन कोंडवाडे, अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
आता पडेगाव ते गोल्फ मैदान रोडवर कारवाई
यानंतर पडेगाव रोड ते एमजीएम गोल्फ क्लबपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली. हा रस्ता विकास आराखड्यानुसार ३० मीटर म्हणजेच जवळपास १०० फुट रुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक मालमत्ता विशेषत: निवासस्थाने बाधित होत आहेत. ही सर्व बांधकामे मागील दोन ते तीन वर्षांपूर्वीच बांधलेली आहेत.