इडीचे छापे, गोळीबाराची धमकी; गृहिणीला 'डिजिटल अरेस्ट'मध्ये ठेवून २५ लाख लुटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:12 IST2025-12-26T12:06:53+5:302025-12-26T12:12:12+5:30
आर्थिक घोटाळ्यात नाव आल्याची दिली धमकी, मुंबई क्राइम ब्रँचच्या नावे १२ ते १५ तास व्हिडीओ कॉल, कुटुंबाला न सांगण्यासाठी विविध कारणांनी केले संमोहित

इडीचे छापे, गोळीबाराची धमकी; गृहिणीला 'डिजिटल अरेस्ट'मध्ये ठेवून २५ लाख लुटले!
छत्रपती संभाजीनगर : आर्थिक घोटाळ्यातील आरोपींच्या जबाबात तुमचे नाव समोर आले असून अटक, इडीचे छापे, घरावर गोळीबार करण्याची धमकी देत संमोहित करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने ५३ वर्षीय गृहिणीला सहा दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवत २५ लाख ८६ हजार रुपये उकळले. पत्नीच्या वागण्यात बदल जाणवल्याने विश्वासात घेतल्यावर पत्नीने याबाबत पतीला सांगितले आणि डिजिटल अरेस्टचा खोटा प्रकार थांबला. बुधवारी पुंडलिकनगर ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
५३ वर्षीय तक्रारदार गृहिणी असून, त्यांचे पती व्यावसायिक सल्लागार आहेत. १६ डिसेंबरला महिला घरी असताना दुपारी ३:०० वाजता कॉल आला. मोबाइलची सेवा समाप्त होणार असून, २ दिवसात मोबाइल बंद होणार असल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ त्यांचा दुसरा मोबाइल क्रमांक अवैध जाहिरातीच्या प्रकरणात निष्पन्न झाल्याचे सांगितले. काही क्षणात महिलेला मुंबई क्राइम ब्रँचच्या नावे व्हिडीओ कॉलवर कनेक्ट करण्यात आले. कॉलवरील क्रमांकाला मुंबई क्राइम ब्रँचच्या नावाचा डीपी व मागे तसेच छायाचित्र असल्याने महिलेचा विश्वास बसला. कॉलवरील व्यक्तीने पोलिस अधिकारी असल्याचे भासवत धमकावून मदतीचे आश्वासन दिले. शिवाय, काळ्या पैशांच्या प्रकरणात तुमचे नाव आले असून, त्यातील अटकेतील आरोपींनी तुमचे नाव सांगितल्याचे सांगत घाबरवून सोडले.
दिवस दिवस व्हिडीओ कॉल, संमोहित करण्याचा प्रकार
महिलेला सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲपवर इडीच्या बनावट नोटिसा पाठवल्या. व्यक्तींची छायाचित्र पाठवून त्यांनी गुन्ह्यात तुमचे नाव घेतल्याचे सांगितले. १६ डिसेंबरला प्राप्त कॉलनंतर सायबर गुन्हेगारांनी महिलेला दिवस दिवस व्हिडीओ कॉल सुरू ठेवत धमकावले. अक्षरश: महिला चार्जिंगला लावून व्हिडीओ कॉल सुरू ठेवत होती. महिला वारंवार निरपराध असल्याचे सांगत होती. मात्र, डिजिटल अरेस्टबाबत कोणालाही न सांगण्यासाठी आरोपींनी तिला एका कागदावर लिहायला सांगून मोठ्याने वाचायला लावण्याइतपत संमोहित केले.
इडीचे छापा पडणार, गोळीबारही करू
- दोन दिवस १२ -१२ तास डिजिटल अरेस्टमध्ये राहिल्यानंतर महिला पुरती घाबरली होती. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या सर्व बँक खात्याची माहिती घेत पैसे पाठवायला सांगितले.
- महिलेने पहिले ४६ हजार रुपये, तर १८ डिसेंबरला एफडी मोडून ६.५ लाख पाठवले. २२ डिसेंबरपर्यंत सातत्याने धमकावून त्यांच्याकडून २५ लाख ८६ हजार रुपये उकळले.
- याबाबत वाच्यता करू नये म्हणून टोळीने त्यांना इडीची धाड, घरावर गोळीबार करण्याची धमकी दिली. या ब्लॅकमेलिंगदरम्यान तुमच्यावर पाळत ठेवून आहोत, असे सांगितल्याने महिला तणावाखाली होती. २३ डिसेंबरला पतीने पत्नीच्या वागण्यात झालेला बदल हेरला आणि विश्वासात घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिस निरीक्षक अशोक भंडारे तपास करत आहेत.
हे कायम लक्षात ठेवा
- कोणताही पोलिस अधिकारी कॉल करून अटक, चौकशी, पैसे मागत नाही.
- इडी, पोलिस, सीबीआय यांच्या नावाने व्हिडीओ कॉल, नोटीस किंवा धमकी आल्यास ती सायबर फसवणूकच असते.
- 'कोणालाही सांगू नका' असे कॉलवर कोणी म्हणताच तो नक्कीच फसवणुकीचा प्रकार असतो.
- असे कॉल आल्यास घाबरू नका, तत्काळ कुटुंबीयांना सांगा. सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार करा.
- कोणत्याही परिस्थितीत पैसे ट्रान्सफर करू नका, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती देऊ नका.