सुसाट कारच्या धडकेत अर्थशास्त्राचा संशोधक जागीच ठार; घरी गर्भवती पत्नी वाट पाहत राहिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:05 IST2025-11-27T13:04:49+5:302025-11-27T13:05:26+5:30
कारच्या अतिवेगामुळे प्राध्यापक आणि त्यांची मुलगी दुचाकीसह हवेत उडून दूरवर फेकले गेले.

सुसाट कारच्या धडकेत अर्थशास्त्राचा संशोधक जागीच ठार; घरी गर्भवती पत्नी वाट पाहत राहिली
छत्रपती संभाजीनगर : शहरात शिकण्यासाठी आलेल्या भाचीला विद्यापीठातील वसतिगृहात सोडून घरी परतत असलेल्या संशोधकाचा सुसाट कारच्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी रात्री ०९:३० वाजता बेगमपुऱ्यातील विद्युत कॉलनीत हा अपघात घडला. ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७), असे मृताचे नाव असून, दुचाकीवर त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची मुलगी मेंदूला मार लागल्याने गंभीर जखमी झाली.
अंबड तालुक्यातील हसनापूर येथील रहिवासी ज्ञानेश्वर एका खासगी महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. पत्नी, मुलीसह ते विद्युत कॉलनीत राहत. त्यांची भाची विद्यापीठात शिकते. बुधवारी ती ज्ञानेश्वर यांच्या घरी गेली होती. रात्री ०९:३० वाजता ते चार वर्षांच्या मुलीसोबत भाचीला विद्यापीठातील वसतिगृहात सोडण्यासाठी गेले. तेथून अंतर्गत रस्त्याने ते घराकडे निघाले. त्याच वेळी सुसाट कार (एमएच २० एचएच ८२५२) समोरून येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीला उडवले. कारच्या अतिवेगामुळे ज्ञानेश्वर व त्यांची मुलगी दुचाकीसह हवेत उडून दूरवर फेकले गेले. ज्ञानेश्वर जागीच ठार झाले. मुलीच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी धाव घेत चालक व कारला ताब्यात घेतले.
अर्थशास्त्रात अत्यंत हुशार, पीएच.डी. सुरू होती
शेतकरी कुटुंबातून आलेेले ज्ञानेश्वर अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांची अर्थशास्त्रात पीएच.डी. सुरू होती. त्यांचे आई, वडील गावाकडे शेती करतात. अपघाताची माहिती कळताच विद्यापीठातील अनेक विद्यार्थी, संशोधकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली.
गर्भवती पत्नी वाट पाहत होती
ज्ञानेश्वर यांची पत्नी गर्भवती आहे. त्यामुळे त्या एकट्या घरी थांबल्या होत्या. रात्री पती, मुलीची वाट पाहणाऱ्या ज्ञानेश्वर यांच्या पत्नीला अपघाताची माहिती कशी द्यावी, असा भावनिक पेच नातेवाइकांसमोर निर्माण झाला होता.
चार दिवसांपूर्वी खरेदी केली होती कार
बेगमपुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारचालक शेख करीम शेख (३९, रा. कुंभार गल्ली, बेगमपुरा) याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चार दिवसांपूर्वीच त्याने सदर कार खरेदी केल्याचे तपासात समजले.