नियम मोडताना ३६८ वाहनचालकांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:29 IST2019-05-19T23:29:34+5:302019-05-19T23:29:52+5:30
वाहतूक नियम मोडून बिनधास्तपणे वाहने पळविणाऱ्या ३६८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई केली.

नियम मोडताना ३६८ वाहनचालकांना पकडले
औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून बिनधास्तपणे वाहने पळविणाऱ्या ३६८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई केली. विशेष म्हणजे शहराच्या विविध भागांमध्ये ही अचानक कारवाई करण्यात आल्याने वाहनचालकांची धांदल उडाली.
वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, वाहतूक नियम मोडल्यामुळे अपघात होतात आणि अपघातात अनेकांना प्राणास मुकावे लागते, अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे बंधनकारक आहे, असे असताना वाहनचालक मात्र नियम मोडून वाहने पळविताना दिसतात. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सतत कारवाई केली जाते.
आज रविवार असल्याने बहुतेक वाहतूक पोलीस साप्ताहिक सुटीवर असतात, यामुळे शहरातील मोजक्याच सिग्नलवर वाहतूक पोलीस नजरेस पडतात. ही बाब वाहनचालकांना माहीत असल्याने वाहनचालक राँग साईडने वाहने नेतात, विना हेल्मेट आणि विना सीटबेल्ट वाहने पळवितात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ९ ठिकाणी आज अचानक वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
सायंकाळी ५ ते ६ कालावधीत ३६८ वाहनचालकांना नियम मोडून वाहने चालविताना पकडले. या सर्व वाहनचालकांना ई-चलन देऊन १ लाख ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त काकडे यांनी दिली. अशा प्रकारची कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.