रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला ‘स्पीड’; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूसंपादनासाठी राजपत्र जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:27 IST2025-11-22T16:26:47+5:302025-11-22T16:27:49+5:30
राजपत्रात शहर परिसरात जिल्ह्यातील गावांमधील भूमिधारकांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला ‘स्पीड’; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूसंपादनासाठी राजपत्र जाहीर
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर-परभणी या १७७ किमी अंतराच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या दृष्टीने जिल्ह्यात भूसंपादनाचे राजपत्र जाहीर करण्यात आले आहे.
पीएम गतिशक्तीअंतर्गत मार्च महिन्यात आयोजित ८८व्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या (एनपीजी) बैठकीत देशभरातील महामार्ग, रेल्वे, माहिती तंत्रज्ञान आणि मेट्रो अशा ११ पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विभागाच्या मंत्रिमंडळीय समितीने जुलैअखेर रेल्वे मंत्रालयाच्या एकूण सुमारे ११ हजार १६९ कोटी रुपये गुंतवणुकीच्या ४ प्रकल्पांना मंजुरी दिली. यात छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वीची मागणी मार्गी लागली. आता दुहेरीकरणासाठी भूसंपादनाचाही तयारी सुरू आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) या ९८ किमी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. आधी मुंबई आणि नंतर परभणीचा रेल्वेचा प्रवास ‘डबल ट्रॅक’ने होईल.
भूमिधारकांची नावे
राजपत्रात शहर परिसरात जिल्ह्यातील गावांमधील भूमिधारकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. किती भूसंपादन करण्यात येणार आहे, याची माहितीही देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण कधीपर्यंत?
अंतर - १७७ किमी
खर्च - सुमारे २,१७९ कोटी
कालावधी : २०२९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य