छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय ग्रंथालयासमोर ‘कचराकोंडी’...वाचनसंस्कृती कशी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 18:47 IST2025-11-22T18:45:43+5:302025-11-22T18:47:01+5:30
आंदोलने, निवेदने, विनंत्या : ढिम्म प्रशासनाला पडला नाही काडीचाही फरक

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय ग्रंथालयासमोर ‘कचराकोंडी’...वाचनसंस्कृती कशी वाढणार?
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : विभागीय ग्रंथालयासमोर महापालिकेकडून गेल्या सात वर्षांपासून कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. यामुळे दुर्गंधी, घाण, मोकाट कुत्री आणि अस्वच्छतेचा प्रचंड त्रास वाचनालयात येणारे वाचक, विद्यार्थी आणि कर्मचारी, अधिकाऱ्यांना सहन करावा लागतो. वाचनालयाची भिंत जेसीबीमुळे अक्षरक्ष: खचली असून, कधीही कोसळू शकते. गेल्या काही वर्षांत आंदोलने, निवेदने, विनंत्या सर्व काही करून पाहिले मात्र ढिम्म प्रशासनाला काडीचाही फरक पडलेला नाही.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे ५० ते १०० विद्यार्थी दररोज वाचनालयाचा वापर करतात. कचरा व त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याचे विद्यार्थी सांगतात. वाचनालयात प्रवेश करतानाच कचऱ्याचा ढिगारा स्वागत करतो. अभ्यास करणे कठीण होते. या प्रश्नावर विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींनी यापूर्वी आंदोलनही केले, मात्र त्यातूनही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही.
मुंबईवरून तक्रारी
वाचनालय प्रशासनानेही माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना निवेदन देण्यापासून ते सध्याचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचविल्या. राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी सुद्धा मुंबईहून आयुक्तांना पत्र पाठविले. तक्रारीनंतर दोन दिवस परिसरात स्वच्छता दिसते; मात्र तिसऱ्याच दिवशी पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे कचऱ्याचे ढीग आणि असह्य दुर्गंधी पसरते, असा आरोप वाचनालय प्रशासनाने केला.
ठोस कारवाई नाही
वाचनालयात आयोजित कार्यक्रमांसाठी मनपा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जेणेकरून प्रत्यक्ष परिस्थिती पाहून ते हा प्रश्न सोडवतील. परंतु, प्रत्यक्ष पाहूनही कोणत्याही अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई केली नाही, अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अनेकदा मनपासोबत पत्रव्यवहार केले, आंदोलने केली. स्मार्ट सिटीने मध्यंतरी स्वच्छता केली. पुन्हा कचरा टाकणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’. आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो होतो; पण भेट होऊ शकली नाही.
सात वर्षांत पुष्कळ प्रयत्न केले; पण काहीही झाले नाही.
-सुनील हुसे, सहायक ग्रंथालय संचालक
कचऱ्यामुळे डास, दुर्गंधीचा त्रास होतो. डोकेदुखीही होते. एकाग्रता साधणे कठीण जाते.
-आकाश बोर्डे, विद्यार्थी
कचऱ्यामध्ये अनेकदा मासही असते. त्यामुळे कुत्रेही जमा होतात. हाड अनेकदा वाचनालयाच्या आतही ते आणून टाकतात. भिंत तर खचलीच आहे शिवाय रंगरंगोटीही अनेक वर्षे झाली नाही.
-संदीप पवार, वाचक
नागरिक कचरा टाकतात
समर्थनगर येथील विभागीय ग्रंथालयासमोर मनपाचे ट्रान्सफर स्टेशन बऱ्याच दिवसांपासून बंद करण्यात आले. या ठिकाणी रहिवासी कचरा आणून टाकतात. हा कचरा उचलून तेथे साफसफाई करण्याचे काम दररोज वॉर्ड कार्यालयामार्फत करण्यात येते. येथे कचरा येऊच नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना मनपाकडून करण्यात येत आहे. तेथे शौचालय उभारता येईल काय, याची चाचपणी सुरू आहे.
- नंदकिशोर भोंबे, उपायुक्त, मनपा.