पोलिस भरतीत डमी उमेदवार, आता लुटमार; बँकतील २५ लाखांची रोकड पळविणारे चौघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:05 IST2025-11-17T19:05:15+5:302025-11-17T19:05:51+5:30
दावरवाडीच्या जिल्हा बँक शाखेतील २५ लाखांची लूटमार २४ तासांत उघड

पोलिस भरतीत डमी उमेदवार, आता लुटमार; बँकतील २५ लाखांची रोकड पळविणारे चौघे ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : दावरवाडीच्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या लिपिकास मारहाण करत शेतकरी अनुदानासाठी नेत असलेली २५ लाखांची रोकड शनिवारी लुटण्यात आली होती. शनिवारी सकाळच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांत उलगडा करत चार मित्रांना अटक केली. भारत राजेंद्र रुपेकर (३०), विष्णू कल्याण बोधने (२४, दोघे रा. नानेगाव, ता. पैठण), सचिन विठ्ठल सोलाट (३५, रा. राहुलनगर, ता. पैठण) व विशाल दामोदर चांदणे (२४, रा. अखातखेडा, ता. पैठण), अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून २५ लाख रुपये रोख जप्त केल्याचे पोलिस अधीक्षक डाॅ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
बँकेचे लिपिक गणेश पहिलवान २५ लाख रुपये घेऊन सकाळी ११ वाजता पैठण-पाचोड मार्गे दावरवाडीकडे निघाले. गावाच्या काही अंतर अलीकडे त्यांच्यावर दगडाचा मारा झाला. तोंड बांधलेल्या दोघांनी अचानक त्यांना अडवत हल्ला चढवत पैसे लुटून पाचोडच्या दिशेने पोबारा केला. राठोड यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांनी तपास सुरू केला.
पैठणच्या शाखेत गेला अन् अडकला
पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात दावरवाडीचा भारत संशयास्पद वाटला. विशेष म्हणजे, दावरवाडीची शाखा भारतच्या घरापासून २ किलोमीटर आहे. तरीही तो पैठणच्या शाखेत का आला, असा प्रश्न पोलिसांना पडला.
-फुटेजमध्ये भारत सातत्याने चलबिचल अवस्थेत पहिलवान यांचा पाठलाग करताना कैद झाल्याने संशय बळावला.
-पथकाने त्याची माहिती घेतली. पैठणच्या शाखेत तो दाेन वर्षांपूर्वी आला होता. त्याच्यावर यापूर्वी गुन्हे असल्याचे कळताच त्याला ताब्यात घेण्याचे ठरले.
-तांत्रिक तपास करून भारतला पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पैशांसह पैठण सोडण्याच्या तयारीत असलेल्या उर्वरित तिघांच्याही कार थांबवून मुसक्या आवळण्यात आल्या.
स्वत:ला १० तर मित्रांना प्रत्येकी ५ लाख
पदवीधर भारतवर २०१७ मध्ये पोलिस भरतीत डमी उमेदवार बसवल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सोलाटवर दारूचे गुन्हे आहेत. विष्णूही कर्जबाजारी आहे. बँकेच्या रोख रकमेची वाहतूक होत असल्याची भारतला कल्पना होती. त्यामुळे भारतने कट रचत मित्रांना सहभागी केले. लुटल्यानंतर १० लाख स्वत:कडे तर तिघांना प्रत्येकी ५ लाखांचे वाटपही झाले. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सहायक निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे, अंमलदार विठ्ठल डाेके, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल चव्हाण, अशोक वाघ, राहुल गायकवाड, अनिल काळे, सनी खरात, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी कारवाई केली.