Drought In Marathwada : खरीप हंगाम गेला, रबीचा विचार न केलेलाच बरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:35 PM2018-10-11T12:35:27+5:302018-10-11T12:37:41+5:30

दुष्काळवाडा : दुष्काळाच्या वारंवार बसणाऱ्या झळांनी बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूही सुकले आहेत. हे भयावह चित्र आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी गावचे. 

Droght In Marathwada: Kharif season went, Rabi is not good at all! | Drought In Marathwada : खरीप हंगाम गेला, रबीचा विचार न केलेलाच बरा!

Drought In Marathwada : खरीप हंगाम गेला, रबीचा विचार न केलेलाच बरा!

googlenewsNext

- रऊफ शेख, गेवराई गुंगी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद

खरीप हंगाम पूर्ण गेल्यात जमा असून, रबी हंगामाचा विचार न केलेलाच बरा. दुष्काळाच्या वारंवार बसणाऱ्या झळांनी बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूही सुकले आहेत. हे भयावह चित्र आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी गावचे. 

मागच्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला. फुलंब्री तालुका मात्र कोरडाच राहिला. गेल्या तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. यंदाचा दुष्काळ, तर त्यापेक्षाही भयंकर आहे. तीन वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर झाला असून, गावात हाताला काम न राहिल्याने गावातील तरुण आता शहराकडे कामासाठी निघाले आहेत.  

फुलंब्रीपासून २० कि.मी. अंतरावर राजूर रस्त्यावर गेवराई गुंगी हे ३ हजार २०० लोकवस्तीचे गाव वसले आहे. मतदारांची संख्या १ हजार ६००. गाव परिसरातील शेतजमीन ६० टक्के जिरायती व ४० टक्के हंगामी बागायती आहे. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने कापूस, मका, तूर, बाजरी हीच पिके घेतात. गावाला एकही नदी नाही. परिसरात पाणी साठवण करण्यासाठी प्रकल्प नाही. त्यामुळे बागायती शेती करणे शक्य नाही. परिणामी, येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने हंगामाची खात्री देता येत नाही.

खरीप पिके वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गेवराई गुंगी येथे १ हजार ६०० शेतकऱ्यांनी यंदा जून महिन्यात कापूस, मका, तूर, बाजरीची लागवड केली; पण लागवडीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पाऊस पडला नाही. परिणामी, मक्याची वाळलेली झाडे व कपाशीची तुरळक, वाढ न झालेली झाडे सध्या शेतात उभी आहेत. भुईमुगानेही मान टाकली आहे. 

दुबार पेरणीने बळीराजाला कर्जबाजारी केले असून, गावातील दीडशेवर तरुण औरंगाबाद शहरात रोजगारासाठी फिरत आहेत. पुंजाबाई वामन हिवराळे ही महिला शेतकरी म्हणाली, माझ्याकडे सहा एकर शेती असून, त्यातील तीन एकरमध्ये मका पेरला आहे. पावसाअभावी मक्याची वाढ झाली नसून, तो आता वाळत आहे.  खर्चही निघणार नसल्याने मक्याची काढणीसुद्धा करणार नाही. 

९ पाझर तलाव कोरडे 
परिसरात अनेक वर्षांपूर्वी ९ पाझर तलाव केले गेले आहेत. ते नादुरुस्त आणि गळके आहेत. पावसाचे पाणी आले तरी त्यात साचून राहत नाही. त्यामुळे या तलावांचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. शिवाय गावातील शेतकऱ्यांच्या शेतात ३०० विहिरी आहेत. त्या आजघडीला कोरड्या पडलेल्या आहेत. नजीकच्या करंजिरा व पठाण मळा हे दोन नाले असून, यावर ९ सिमेंट बंधारे आहेत. यंदा पाऊसच नसल्याने त्यात घोटभरही पाणी नाही.  

पावसाळ्यातही टँकर 
पावसाळा असूनही गेवराई गुंगी येथील लोकांना उन्हाळाच जाणवत आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत ३ टँकर सुरू होते. ते आता बंद झाले असून, गावकरी पुन्हा टँकर सुरू करण्याची मागणी करीत आहेत.  

पशुधनही संकटात
पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. फुलंब्री तालुक्यात सुमारे एक लाख २० हजार जनावरे आहेत. यंदा खरीप हंगामात पाऊस मुबलक पडला नाही. मक्याचा थोडाफार चारा मिळाला असून, रबी हंगाम येणार नसल्याने चाराटंचाई निर्माण होणार आहे.  

दुबार पेरणीही गेली वाया 
गेवराई गुंगी परिसरात दुबार पेरण्या झाल्या असून, १६ आॅगस्टनंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. 
- शिरीष घनबहादूर, कृषी अधिकारी, फुलंब्री
 

बळीराजा काय म्हणतो?
 

- यंदा दुबार पेरणी करूनही पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने मशागतीपासून पेरणीपर्यंत केलेला खर्चही निघणार नाही. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. -नामदेव साबळे  

- माझ्या चार एकरमधील कपाशी व मका पूर्णपणे वळून गेली असून शासनाने आर्थिक मदत करावी. तसेच गावात रोजगार हमी योजनेचे काम सुरु करावे. -प्रकाश डकले  

- माझ्याकडे तीन एकर शेती असून यात कपाशी व मकाची लागवड केली होती. पाण्याअभावी ही पिके वाया गेली आहेत. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने येणाऱ्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. -देवीदास म्हस्के 

- बागायती शेती करणेही अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे पावसावर अवलंबून राहावे लागते. यंदाही पावसाने धोका दिल्याने खरीप पिके वाळली असून कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुठेतरी कामावर जावे लागणार आहे. -उत्तम डकले 

- मागील वर्षीचे बोंडअळीचे अनुदान मिळाले नाही. यंदा खरीप पिके वाया गेली. रबी पिके येणार नसल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. शिवाय जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी छावण्या उघडाव्या लागतील. -शेख लतीफ 

Web Title: Droght In Marathwada: Kharif season went, Rabi is not good at all!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.