चक्कर आल्याने चालकाने मान टाकली; वाहकाने धाव घेऊन हाताने दाबले ब्रेक, ३५ प्रवासी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:15 IST2025-07-14T19:14:44+5:302025-07-14T19:15:23+5:30

सावंगी टोलनाक्याजवळील घटना : ३५ प्रवाशांचा वाचला जीव

Driver lost consciousness due to dizziness; conductor ran and applied hand brakes, saving 35 passengers | चक्कर आल्याने चालकाने मान टाकली; वाहकाने धाव घेऊन हाताने दाबले ब्रेक, ३५ प्रवासी बचावले

चक्कर आल्याने चालकाने मान टाकली; वाहकाने धाव घेऊन हाताने दाबले ब्रेक, ३५ प्रवासी बचावले

सिल्लोड : सिल्लोड-नाशिक एसटी बस घेऊन जाताना अचानक बसचालकाच्या छातीत दुखू लागले. चक्कर येऊन त्यांनी तशीच स्टिअरिंगवर मान टाकली. तत्पूर्वी त्यांनी इशारा केल्यामुळे वाहकाने केबिनमध्ये धाव घेत हाताने ब्रेक दाबून बसला नियंत्रित केले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवर सावंगी टोलनाक्याजवळ घडलेल्या या घटनेत ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.

सिल्लोड आगारातील बसचालक काळे व वाहक अमोल गोसावी हे रविवारी सकाळी आठ वाजता सिल्लोड-नाशिक ही बस घेऊन सिल्लोडहून नाशिककडे निघाले होते. चौका घाटाच्या पुढे सावंगी टोलनाक्याजवळ ९:३० वाजता चालक काळे यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना चक्कर येताच त्यांनी वाहक गोसावी यांना बस कंट्रोल करा, असे म्हणत स्टिअरिंगवर मान टाकली. आणीबाणीची ही स्थिती लक्षात येताच वाहक गोसावी यांनी तत्काळ चालकाच्या केबिनमध्ये धाव घेतली. चालक काळे यांच्या पायाखाली असलेल्या ब्रेकवर त्यांनी हाताने दाब देऊन धावती बस नियंत्रित करून थांबविली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या दरम्यान गोंधळ उडून सर्व प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता. मात्र बस सहीसलामत थांबल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, काळे यांना रुग्णालयात नेण्यात आले; तर प्रवाशांना वाहकाने दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले.

डॉक्टर दाम्पत्य आले धावून
बस थांबल्यानंतर पाठीमागून एक डॉक्टर पत्नी व छोट्या मुलासह मोटारसायकलवरून जात असताना तेथे आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरनी चालक काळे यांची तपासणी केली. त्यांनी लगेच त्यांना दवाखान्यात घ्यावे लागेल, असे सांगितले. दरम्यान, एका कारमधील व्यक्तींनी त्यांच्या कारमध्ये बसवा, असे सांगितले. तेव्हा सदर डॉक्टर आपल्या फॅमिलीला तेथेच रस्त्यावर थांबवून चालक काळे यांच्यासोबत रुग्णालयात रवाना झाले. काळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

Web Title: Driver lost consciousness due to dizziness; conductor ran and applied hand brakes, saving 35 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.