दिवसाढवळ्या चालकावर कटरने वार, डोळ्यांत मिरची पूड; स्टील कंपनीचे २७ लाखांचे 'कॅश' लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:18 IST2025-10-29T14:11:56+5:302025-10-29T14:18:16+5:30
चालकाच्या हातावर धारदार कटरने वार करून २७ लाख रुपये लुटले; सकाळी साडेदहाच्या सुमारास लूटमार

दिवसाढवळ्या चालकावर कटरने वार, डोळ्यांत मिरची पूड; स्टील कंपनीचे २७ लाखांचे 'कॅश' लुटले
छत्रपती संभाजीनगर : जालना येथील एका स्टील कंपनीची २७ लाख ५ हजार ९१० रुपयांची बॅग कारमध्ये ठेवत असताना चालकावर धारदार कटरने वार करून दोन अनोळखींनी लुटले. ही घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी १०:३० वाजता न्यू श्रेयनगर येथे घडली. या घटनेत वाहनचालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
न्यू श्रेयनगर येथील रहिवासी दिनेश राधेश्याम साबू हे जालना येथील एका स्टील कंपनीत नोकरी करतात. कंपनीच्या डिलर्सकडून स्टीलचे पैसे जमा करून कंपनीत जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. सोमवारी रात्री ९:४० वाजेच्या सुमारास ते नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून २७ लाख ५ हजार ९१० रुपये घेऊन घरी आले. ही रक्कम आज मंगळवारी जालना येथील कंपनीत जमा करायची होती. ते कारचालक गणेश ओंकारराव शिंदे (४८, रा. म्हात्रेवाडी, बदनापूर) याच्यासह जालना येथे जाणार होते.
सकाळी १० वाजता गणेश त्यांच्या घरी आला. १०:३० वाजेच्या सुमारास त्यांनी पैशांची कापडी पिशवी गणेशच्या हातात दिली. ते घरातून जेवणाचा डब्बा घेण्यास गेले. रोख रकमेची पिशवी गणेश गाडीत ठेवत होता. यानंतर अवघ्या काही मिनिटांत गणेशच्या ओरडण्याचा आवाज आला. यामुळे साबू हे घराबाहेर आले तेव्हा गणेशने सांगितले की, दोन अनोळखींनी त्याच्या हातावर कटरने वार करून व डोळ्यांत मिरची पावडर फेकून रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. यानंतर आरोपी पळून गेले. गणेशच्या हाताला जबर जखम झाली होती. यामुळे त्याला घेऊन ते तत्काळ खाजगी रुग्णालयात गेले. यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.