प्रेक्षकांवर विशिष्ट भाषेतील चित्रपटांचे बंधन लादू नका: नागराज मंजुळे

By सुमेध उघडे | Published: January 12, 2023 12:53 PM2023-01-12T12:53:07+5:302023-01-12T12:56:00+5:30

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

Don't force films in a specific language on the audience: Nagaraj Manjule | प्रेक्षकांवर विशिष्ट भाषेतील चित्रपटांचे बंधन लादू नका: नागराज मंजुळे

प्रेक्षकांवर विशिष्ट भाषेतील चित्रपटांचे बंधन लादू नका: नागराज मंजुळे

googlenewsNext

औरंगाबाद : माध्यमे मुक्त होत आहेत. देशी-विदेशी भाषेतील चित्रपटांची कॉपी आता चालणार नाही, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्पर्धा आहे. प्रेक्षक भाषेचे बंधन न बाळगता चांगले चित्रपट पाहतात. मराठीच बघा, असा आग्रह करू नका. फिल्ममेकर्संनी चांगले दर्जेदार कथानक असलेले चित्रपट बनवावेत, बॉक्स ऑफिसचा विचार करू नये, असे आवाहन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.

आठव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, किशोर कदम (सौमित्र), उमेश कामत, प्रवीण डाळींबकर, ज्युरी मेंबर ज्युडी गसस्टोन, एन. विद्याशंकर, विश्वदीप चटर्जी, धरम गुलाटी, प्रिया कृशांस्वामी, प्रेमेंद्र मुजुमदार, फैझल खान, संयोजक नीलेश राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महोत्सवाचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी प्रास्ताविक केले. संचालक अशोक राणे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

मंजुळे म्हणाले की, दर्शकांना जे कळलेले असते, ते बरेचदा फिल्ममेकर्सना समजत नाही. आशयासाठी तंत्रज्ञान राबते. गोष्ट सांगणारा कोण आहे, काय सांगायचे आहे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी असे महोत्सव गरजेचे आहेत. वेरूळला एलोरा का म्हणतात, हा प्रश्न उपस्थित करत आपलेपणा जपा, असेही मंजुळे म्हणाले. यावेळी बांधकाम व्यावसायिक नवीन बगडिया, संचित राजपाल, प्रोझोन हेड कमल सोनी यांची विशेष उपस्थिती होती.

अरुण खोपकर यांना जीवनगौरव
चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिग्दर्शक अरुण खोपकर यांना अंकुशराव कदम, नंदकिशोर कागलीवाल यांच्या हस्ते पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चार दिवस चित्रपटांची मेजवानी
हा महोत्सव पुढील चार दिवस असून, यात विविध भाषेतील जागतिक दर्जाचे ५५ चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.

पुणे, मुंबईच्या धर्तीवर येथे चित्रपट महोत्सव करू
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले की, पुणे, मुंबईच्या तोडीचा महोत्सव पुढील वर्षी औरंगाबादेत घेऊ. यासाठी प्रशासन तयार आहे.

Web Title: Don't force films in a specific language on the audience: Nagaraj Manjule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.