दुखणे डॉक्टरचे; ‘ताप’ आरोग्य विभागाला!

By Admin | Updated: January 29, 2015 01:15 IST2015-01-29T00:58:29+5:302015-01-29T01:15:52+5:30

संजय तिपाले , बीड रुग्णांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी नेमलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचेच आरोग्य ठीकठाक आहे की नाही? या भलत्याच चिंतेने जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘ताप’ सध्या वाढला आहे

Doctor of Pain; 'Fever' to health department! | दुखणे डॉक्टरचे; ‘ताप’ आरोग्य विभागाला!

दुखणे डॉक्टरचे; ‘ताप’ आरोग्य विभागाला!



संजय तिपाले , बीड
रुग्णांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी नेमलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचेच आरोग्य ठीकठाक आहे की नाही? या भलत्याच चिंतेने जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘ताप’ सध्या वाढला आहे. ‘उपचार नको, डॉक्टर आवर’ या गावकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित अधिकाऱ्याला ‘बुस्टरडोस’ देऊन ‘दुखण्या’तून बाहेर काढता येते का? याची चाचपणी सुरु केली आहे.
उपचाराची गरज भासली ते वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत गेवराई तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर! पाच वर्षांपूर्वी ते तेथे रुजू झाले. तेंव्हापासून त्यांच्या ‘तऱ्हा’ कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनाही नित्याच्या झाल्या आहेत. कधी आरोग्य केंद्राला स्वत: टाळे ठोकणे, कधी वाहनाची चावी घेऊन जाणे तर कधी रुग्णांवरच खेकसणे... या विचित्र वागण्यामुळे केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही रोडावली आहे. अडला - नडला रुग्ण उपचारासाठी गेलाच तर त्याच्यावर उपचार होतील की नाही? याची शंका असते. त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर आता जिल्हा परिषदेने संबंधित डॉक्टरच्या आरोग्याची तपासणीची मोहीम हाती घेतली आहे.
१२ मे २०१२ रोजी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी येरवडा येथे गेलेच नाही, असे कळविले होते. पुन्हा गावकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ सुरु झाल्याने आरोग्य विभागाने त्यांच्या तपासणीच्या हालचाली आहेत.
चार वर्षांपूर्वी आरोग्य केंद्रातून पंखा चोरीला गेला होता, तेंव्हापासून हे डॉक्टर महाशय रात्री मुख्यालयावरील घरी जाताना केंद्राला टाळे लावतात. शासकीय वाहनातून बैठकीसाठी बाहेरगावी गेल्यावर चालकाला खाली उतरवून गाडीची चावीही ते स्वत:कडे ठेवतात. पंखा चोरीपासून त्यांनी घेतलेला ‘धडा’ त्यांच्या आरोग्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

Web Title: Doctor of Pain; 'Fever' to health department!