कर्ज न देताच सातबाऱ्यावर बोजा

By Admin | Updated: August 27, 2014 00:14 IST2014-08-27T00:10:45+5:302014-08-27T00:14:54+5:30

सुनील कच्छवे, औरंगाबाद तालुक्यातील पांढरी पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याला बँकेने पीककर्ज मंजूर केले.

Do not burden on seven bars without taking loans | कर्ज न देताच सातबाऱ्यावर बोजा

कर्ज न देताच सातबाऱ्यावर बोजा

सुनील कच्छवे, औरंगाबाद
तालुक्यातील पांढरी पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याला बँकेने पीककर्ज मंजूर केले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सातबाऱ्यावर एक लाख रुपयांचा बोजाही टाकला; पण चार महिने उलटले तरी त्याला कर्ज मात्र मिळालेले नाही. त्यामुळे हा शेतकरी बँकेत दररोज खेट्या घालत आहे.
लक्ष्मण तोताराम घुनावत, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पांढरी पिंपळगाव येथे घुनावत यांची सहा एकर शेती आहे. त्यांनी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चित्तेपिंपळगाव येथील शाखेत पीककर्जाची मागणी केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांचे पीककर्ज देण्याची तयारी दर्शविली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बँकेने त्यांना एक लाख रुपयांचे पीककर्ज मंजूर केले.
बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सातबाऱ्यावर बोजा टाकून आणण्यासाठी पत्र दिले. हे पत्र दाखविल्यानंतर तलाठ्याने घुनावत यांच्या सातबाऱ्यावर एक लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा टाकला; पण तरीही घुनावत यांना प्रत्यक्षात कर्जाची रक्कम मात्र मिळाली नाही. पुढे काही दिवसांतच बँकेचा शाखा व्यवस्थापक बदलून गेला. त्याजागी आलेल्या शाखा व्यवस्थापकाने घुनावत यांना महिनाभर थांबण्याचा सल्ला दिला; परंतु महिना उलटूनही कर्ज मिळाले नाही. त्यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यास खाजगी व्यक्तीकडून हातउसने पैसे घेऊन पेरणी करावी लागली.
निदान आता तरी पीककर्जाची रक्कम मिळेल आणि हातउसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येईल, असे वाटत होते; पण त्यानंतरही बँकेकडून मंजूर कर्जाचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरूच राहिली.
आता तब्बल चार महिने उलटले तरी मंजूर कर्जाचे पैसे न मिळाल्याने घुनावत यांनी बँकेच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात धाव घेतली आहे.

Web Title: Do not burden on seven bars without taking loans