डायल ११२ च्या बिट मार्शलच्या पथकाने अट्टल गुन्हेगारास पकडले ,जवाहरनगर पोलिसांची कारवाई
By राम शिनगारे | Updated: May 23, 2023 20:38 IST2023-05-23T20:38:20+5:302023-05-23T20:38:27+5:30
जबरी चोरी, दुचाकी चोरीचे गुन्हे उघड

डायल ११२ च्या बिट मार्शलच्या पथकाने अट्टल गुन्हेगारास पकडले ,जवाहरनगर पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : जबरी चोरीसह अट्टल दुचाकी चोराला जवाहरनगर पोलिसांच्या डायल ११२ बिट मार्शलच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई दर्गा भागातील आठवडी बाजारात केली. विशाल रमेश कसबे (२२, रा. पुंजाबाई चौक, ग.नं- ५, गारखेडा परिसर) असे पकडलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
जवाहरनगर ठाण्याचे डायल ११२ बिट मार्शल जमादार चंद्रकांत पोटे, मारोती गोरे हे दर्गा चौक परिसरातील आठवडी बाजारात गस्त घालीत होते. त्यांना दुचाकी, जबरी चोरीतील गुन्हेगार येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार येथील सोमवार आठवडी बाजार असल्याने गस्त घालीत होते. तेव्हा त्यांना दुचाकी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी बाजारात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी निरीक्षक केंद्रे यांना माहिती दिली. केंद्रे यांच्या आदेशाने उपनिरीक्षक वसंत शेळके हे सुद्धा दर्गा भागात पोहचले.
बाजाराच्या समोरील रस्त्यावर सापळा लावला. कसबे हा शंभुनगरकडुन आठवडी बाजाराकडे येत असतांना दिसला. त्याला पकडताना तो सिग्मा हॉस्पीटलच्या बाजुसच्या वाहत्या नाल्यात उडी मारून काटेरी झुडपातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. ठाण्यात त्याची चौकशी केल्यानंतर त्याने त्रिशरण चौकातून एक दुचाकी मित्र रितेश दोडवे, शेख आदिल यांच्या सोबत चोरल्याचे सांगितले. तसेच तिघांनी सातारा परिसरात एकाला चाकूचा धाक दाखवून खिशातील चार हजार रुपये, मोबाईल लुटून नेल्याची कबुली दिली. कसबेच्या विरोधात चार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.