डेंग्यू झाला अन् डाव साधला; विश्वासू दलालांचा व्यापाऱ्यास ३० कोटी ८१ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:20 IST2025-07-28T17:15:11+5:302025-07-28T17:20:01+5:30

या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल

Dengue fever and conspiracy; Trusted brokers cheat businessman of Rs 30 crore 81 lakh | डेंग्यू झाला अन् डाव साधला; विश्वासू दलालांचा व्यापाऱ्यास ३० कोटी ८१ लाखांचा गंडा

डेंग्यू झाला अन् डाव साधला; विश्वासू दलालांचा व्यापाऱ्यास ३० कोटी ८१ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीतील दोन कंपन्या विकत घेण्याचा व्यवहार सुरू असतानाच विश्वासू दलालांनी विकत घेणारा व्यापारी आजारी पडल्यामुळे दोन्ही कंपन्या बनावट कागदपत्रे, सह्यांच्या आधारे स्वत:च्याच नावावर करून घेतल्या. या प्रकरणात व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून दोन दलालांसह बँक व्यवस्थापक, कंपनीची विक्री करणाऱ्या एकूण सात अधिकाऱ्यांच्या विरोधात ३० कोटी ८१ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी सिडको पोलिसांनी २६ जुलैला नोंदविला.

आरोपींमध्ये खरेदी विक्री - विक्रीचा व्यवसाय करणारे दलाल राजू राठोड, संजय फोके (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह कंपनीचे अधिकारी सोमनाथ बिस्वास, शिवप्रकाश नायर, मन्सूर दलाल (रा. पुणे) यांच्यासह कंपनीचे इतर अधिकारी आणि सिडको, एन-५ भागातील कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे. गोपाल अग्रवाल हे कापसासंबंधीत व्यवसाय दलालामार्फत करतात. त्यांच्या तक्रारीनुसार संजय फोके हा त्यांच्या कापसाच्या व्यवसायात दलाल म्हणून २० वर्षांपासून काम करतो. तो अग्रवालांच्या जमिनीच्या खरेदी - विक्रीचे व्यवहारही कमिशनवर करीत होता. त्यानेच राजू राठोडची त्यांच्याशी २०१८-१९मध्ये भेट घडविली. तेव्हापासून दोघे त्यांच्या जमिनीच्या खरेदी - विक्रीचे व्यवहार पाहात.

या दोघांसोबत अग्रवाल यांनी २०२० मध्ये संयुक्त भागीदारीत रामानुज व्हेंचर्स नावाची संस्थाही सुरू केली. सप्टेंबर २०२०मध्ये अग्रवालांना पुण्यातील व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या चिकलठाणा एमआयडीसीतील दोन सबसिडरी कंपन्या मराठवाडा रिअल्टरर्स प्रा. लि. आणि ॲलमेट कॉर्पोरेशन लि. विक्रीस असल्याची माहिती पुण्यातील मन्सूरने दिली. दोन्ही कंपन्यांची किंमत ३० कोटी ८१ लाख रु. ठरली. अग्रवालांच्या नावे ५० आणि फोके, राठोडच्या नावे प्रत्येकी २५ टक्के असे ठरले. ॲलमेंट कॉर्पोरेशनची १०० टक्के मालकी अग्रवालांच्या कंपनीला देण्यात आली. औद्योगिक प्लॉटचे व्यावसायिकमध्ये रुपांतर करण्यासाठी अग्रवालांनी ४ कोटी रु. एमआयडीसीला दिले. रामानुज व्हेंचर्सकडून ‘व्हॅस्काॅन’ला १३ कोटी ३९ रुपये देण्यात आले. ॲलमेंट कंपनीचे पैसेही अग्रवालांनी पाठविले.

डेंग्यू झाला अन् डाव साधला
अग्रवाल यांना डेंग्यू झाल्यावर मुंबईला उपचारासाठी हलविले होते. त्याच काळात फोके व राठोड यांनी ‘व्हॅस्काॅन’च्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करीत २८ मार्चला मराठवाडा रिअल्टरर्स आणि ३१ मार्च ३०२५ रोजी ॲलमेट कॉर्पोरेशनचे शेअर ट्रान्सफर करीत १०० टक्के भागीदारी स्वत:च्या नावावर करून घेतली.

Web Title: Dengue fever and conspiracy; Trusted brokers cheat businessman of Rs 30 crore 81 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.