दिल्ली-शिर्डी विमान खराब हवामानात अडकले; वैजापूरच्या आकाशात घिरट्यांनी नागरिकांत धडकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:04 IST2026-03-31T20:04:09+5:302026-03-31T20:04:44+5:30
शिर्डीला जाणारे विमान सुरतकडे वळवले; छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेलाही खराब हवामानाचा फटका

दिल्ली-शिर्डी विमान खराब हवामानात अडकले; वैजापूरच्या आकाशात घिरट्यांनी नागरिकांत धडकी
छत्रपती संभाजीनगर : दिल्लीहून शिर्डीला येणारे इंडिगोचे विमान सोमवारी सायंकाळी खराब हवामानात अडकले. दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर शिर्डीपासून काही अंतरावर असतानाच या विमानाला खराब वातावरणाला सामोरे जावे लागले. परिणामी, या विमानाने वैजापूर तालुक्यात आकाशात बऱ्याच वेळ घिरट्या मारल्या. त्यामुळे या भागातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खराब वातावरणामुळे अखेरीस हे विमान शिर्डीऐवजी सुरतकडे वळविण्यात आले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या दिल्ली, नवी मुंबई, हैदराबादच्या विमानालाही विलंब झाला.
शिर्डीला येणाऱ्या या विमानाने सायंकाळी ६.१६ वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेतले. शिर्डी विमानतळापासून काही अंतरावरच असताना विमानाला खराब हवामानाला सामोरे जावे लागले. वैमानिकाने पुढे जाण्याऐवजी वैजापूर तालुक्याच्या आकाशात विमानाच्या घिरट्या मारल्या. आकाशात एक विमान सतत घिरट्या मारत असल्याचे नागरिकांच्या निदर्शास पडले. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी या विमानाचे व्हिडिओही काढले. सामाजिक माध्यमांवर यासंदर्भात पोस्टदेखील व्हायरल झाले. बऱ्याच वेळ घिरट्या मारून हे विमान सुरत विमानतळावर उतरले. दुसरीकडे खराब वातावरणात छत्रपती संभाजीनगरला दिल्लीहून रात्री ८:५० वाजता येणारे इंडिगोचे विमान रात्री ९:५५ वाजता आले. नवी मुंबईहून येणारे विमान रात्री ८:२५ वाजेऐवजी रात्री ८:५३ वाजता आले. तर हैदराबादहून छत्रपती संभाजीनगरला रात्री ७:५० वाजता येणारे विमान रात्री ९:१९ वाजता आले.
संपर्क तुटला होता?
आकाशात घिरट्या मारणाऱ्या विमानाचा काही वेळेसाठी यंत्रणेशी संपर्क तुटल्याची शक्यता वर्तविण्यात आली. ऑनलाइन प्रणालीत हे विमान काही वेळेसाठी दिसेना झाले होते.