भूम तालुक्यात दूध उत्पादनात घट

By Admin | Updated: August 7, 2014 02:06 IST2014-08-06T00:58:49+5:302014-08-07T02:06:09+5:30

दूध उत्पादनासाठी काही वर्षापूर्वी भूम तालुका अग्रेसर होता.

Decrease in milk production in Bhum Taluka | भूम तालुक्यात दूध उत्पादनात घट

भूम तालुक्यात दूध उत्पादनात घट

दूध उत्पादनासाठी काही वर्षापूर्वी भूम तालुका अग्रेसर होता. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाला गती मिळाली होती. मात्र सततचा दुष्काळ, चाऱ्याचे वाढलेले भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, दूध उत्पादनातही कमालीची घट झाली आहे. दोन महिन्यापूर्वी २ लाख ३० हजार ते २ लाख ५० हजार लिटर एवढे भूम तालुक्यात दूध संकलन होत होते. ते आता १ लाख ८० हजार लिटरवर आले आहे.
भूम तालुक्यात तसे बागायत क्षेत्र कमी होते. याबरोबरच हा डोेंगराळ भाग असल्याने फळबागांची संख्याही अत्यल्प होती. अशा स्थितीत जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे मोठ्या संख्येने वळले. त्यामुळे अवघ्या काही वर्षातच भूम तालुक्याची दुग्ध उत्पादनातील अग्रेसर तालुका म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण झाली. भूमसह परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्र उभारली. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खुळखुळू लागला. वाढत्या दूध संकलनाबरोबरच दुधावर प्रक्रिया उद्योग उभारण्याकडेही शेतकरी आकृष्ट झाला. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतातच मोठ्या प्रमाणात खवा भट्या उभारल्या. याद्वारे नाशिक, पुण्यासह हैदराबादसारख्या मोठ्या शहरात भूम तालुक्यातील खवा जावू लागला. खवा भट्यांमुळे अनेक बेरोजगारांच्या हातालाही काम मिळाले. हा व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी शासनानेही विविध योजना सुरु केल्या असल्या तरी त्याचा थेट लाभ दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच मागील तीन वर्ष पावसाने भूम तालुक्याकडे पाठ फिरविली आहे. पावसाअभावी चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला असून, जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सद्यस्थितीत चाऱ्याचे भाव अडीच ते तीन हजारावर पोहंचले आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात चारा नाही. आणि परजिल्ह्यातून चारा आणण्यास बंदी असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी दुभती जनावरे मिळेल त्या किंमतीत बाजारात विकू लागल्याचे चित्र आहे. शासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Decrease in milk production in Bhum Taluka