गंगापूर तालुक्यात वाळूच्या दरडखाली दबल्याने एका तरुणाचा गुदमरून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 19:33 IST2018-11-21T19:32:16+5:302018-11-21T19:33:10+5:30
याप्रकरणी रात्री उशिरा गंगापूर ठाण्यात एका जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर तालुक्यात वाळूच्या दरडखाली दबल्याने एका तरुणाचा गुदमरून मृत्यू
गंगापूर (औरंगाबाद ) : तालुक्यातील हादियाबाद शिवारातील शिवना नदीपात्रात वाळूची दरड कोसळून त्याखाली दबल्याने एका तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशिरा गंगापूर ठाण्यात एका जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय बाबासाहेब साळवे (१८, रा. मालुंजा खुर्द ता. गंगापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बाबासाहेब भानुदास साळवे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विलास भास्कर साळवे (रा. मालुंजा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, शिवना नदीपात्रात मालुंजाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास नेहमीप्रमाणे अजय साळवे व त्याचे जोडीदार टेम्पोमध्ये वाळू भरत होते. याचवेळी वाळूची दरड कोसळल्याने टेम्पोसह अजय वाळूखाली दबला. वाळूची दरड मोठी असल्याने अजयचा त्याखाली दबून जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान, घटना स्थळ गावापासून जवळच असल्याने सदर माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अथक परिश्रमानंतर अजयला वाळूच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नागरिकांनी अजयला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथे डॉक्टरांनी तपासून अजयला मृत घोषित केले.
गंगापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन जोमात सुरूआहे. वाळू उपशासाठी शासनाने घालून दिलेले सर्व नियम वाळू तस्कराकड़ून धाब्यावर बसविले जात असून, यास अधिकारी व वाळूमाफियांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथील वाळू उपशावर बंदी घालावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
आरोपीविरूद्ध गुन्हा
याप्रकरणी बाबासाहेब भानुदास साळवे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विलास भास्कर साळवे (रा. मालुंजा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.